लोकमत न्यूज नेटवर्कशशिकांत गणवीरभेजगाव : मागील वर्षभरापूर्वीच मुदत संपलेल्या मात्र अद्यापही ग्रामपंचायतच्या निवडणुका न झाल्याने वर्षभरापासून प्रशासकराज असलेल्या मूल तालुक्यातील भेजगाव, सिंतळा ग्रामपंचायतच्या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
बहुप्रतीक्षित लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका पार पडल्या. दोन्ही ठिकाणी महायुतीचाच डंका वाजला असून सरकारही स्थापन झाले. आता निवडणूक विभाग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जि. प. व पंचायत समितीच्या निवडणुका तीन महिन्यांत घेण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर जाऊ शकतात. ग्रामपंचायतीवर त्यामुळे पुन्हा प्रशासकच किती दिवस राहणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने प्रशासनाने यावर्षीचा पंधरावा वित्त आयोगासह इतरही येणारा निधी थांबविला आहे. परिणामतः निधीअभावी ग्रामविकास खुंटत असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे. प्रशासनाने मागील वर्षी डिसेंबर २०२३ पर्यंत संपणाऱ्या मुदत ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या. मात्र काही ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी २०२४ मध्ये संपणार होत्या. त्या ग्रामपंचायतीवर प्रशासकराज आहे. आता तरी निवडणूक होणे अपेक्षित आहेत. मात्र भेजगाव, सिंतळा ग्रामपंचायतचा पंचवार्षिक कार्यकाळ ११ जानेवारी २०२४ ला संपला. आता वर्षभरापासून तिथे प्रशासकराज आहे.
प्रशासन तयारीतलोकसभा, विधानसभा निवडणूक संपल्या असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकासंदर्भात प्रशासनाने वॉर्ड व आरक्षण सोडत यासारखी प्रशासकीय बाब पूर्ण करून प्रशासन सज्ज आहे, असे दाखवून दिले आहे. कोणत्याही क्षणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील, या आशेने गाव पुढारी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र सध्या तरी गाव पुढाऱ्यांचे मनसुबे लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्यास गावागावांत राजकीय वातावरण तापणार आहे.