कोरपना : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे या शहरात सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
सद्यस्थितीत या ठिकाणी साधा प्रवासी निवारासुद्धा नाही. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस झेलत प्रवाशांना रस्त्यावर उभे राहिल्याखेरीज पर्याय नाही. या ठिकाणी बसचे वेळापत्रकसुद्धा लावले नसल्याने प्रवाशांना कित्येक तास ताटकळत उभे राहावे लागते. तसेच विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना पास सुविधा केंद्र नसल्याने त्यांना राजुरा येथे जावे लागते. गेल्या ३० वर्षांपासून येथे बसस्थानकाची निर्मिती करण्यात यावी. यासंदर्भात प्रवाशांकडून मागणी होत आहे. या अनुषंगाने अनेकदा जागेची पाहणीसुद्धा राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आली. मात्र, अद्याप बसस्थानक निर्मितीच्या दृष्टीने जागेची निश्चिती होऊ शकली नाही. त्यामुळे कोरपनात बसस्थानक केव्हा साकारले जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे. कोरपना हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथून चंद्रपूर, आदिलाबाद, वणीकडे जाणारे प्रमुख तीन महामार्ग जोडले गेले आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांची दैनंदिन वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. यासाठी बसस्थानकांची नितांत गरज आहे.
बॉक्स
थेट बससेवेचा अभाव
कोरपना येथून अमरावती, आदिलाबाद, नांदेड, लातूर, उदगीर, किनवट, वणी, वरोरा, चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर, भोयगाव, कोडशी, पारडी, परसोडा, मांगलहिरा, येल्लापूर आदी ठिकाणांसाठी नियमित बस धावतात. मात्र, राज्याची उपराजधानी व विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपूरसह वरोरा (वणीमार्गे), निर्मल असिफाबाद, अहेरी, ब्रह्मपुरी, पांढरकवडा, घुग्घुस, उमरेड, गडचिरोली, जिवती, नांदा, कवठाळासाठी नियमित बसची गरज असताना एकही थेट बस सोडली जात नाही.