घुग्घूस : वेकोलीच्या रामनगर कामगार वसाहतीमधील शुभम फुटाणे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या अपहरणाला आठ दिवस झाले. मात्र अजूनही पोलिसांना धागेदोरे गवसले नाहीत. शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घुग्घूस पोलीस ठाण्याला भेट देऊन सदर प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केली व समोरील तपासाबाबत दिशा दिल्याचे कळते.
अनेकांनी शुभमच्या अपहरण प्रकरणाच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. पोलीस तपासापासून मित्र व त्याच्या आईवडिलांना मानसिक त्रास होत आहे. रविवारी शुभम घरून मित्राकडे जातो, असे सांगून गेला. रात्री साडेआठच्या दरम्यान अपहरण झाल्याची बाब लक्षात आली. पोलिसांनी तपास चक्रे लगेच फिरविली. आजपर्यंत त्याच्या जवळपास २० मित्रांकडून वारंवार विचारपूस केली, सीसीटीव्हीच्या माध्यमातून शुभमला शोधण्यासाठी तपास केला. मात्र शुभमबाबत काही सुगावा लागला नाही. जसजसे दिवस लोटत आहे, तसे तर्कवितर्क लावले जात आहेत. शुभम हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा असल्याने त्यांची मानसिक अवस्था ढासळत आहे. मित्रमंडळी पोलिसांच्या तपासाला कंटाळली असून तीही मानसिक तणावात आली आहेत.
पोलिसांनी तपास करावा. मात्र कोणाची मानसिकता खराब होऊ नये, याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांना विविध पक्षांच्या नेत्यांनी केली.