चंद्रपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने गरिबांसाठी मोफत अन्नधान्य पुरविण्याची योजना आहे. असे असतानाही कोठारीमध्ये आई आणि मुलीचा भुकेने बळी गेला आहे. मग मोफत अन्नधान्य जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित करून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक योगेश समरित यांनी केली आहे. यासंदर्भात राज्य तसेच केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
कोठारी येथे राहणाऱ्या झेलुबाई पोचू चौधरी आणि मुलगी माया मारोती पूलगमकर या दोघींचा अन्न न मिळाल्यामुळे भुकेने मृत्यू झाला. चंद्रपूर तसेच बल्लारपूरपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावात ही घटना घडली आहे. राज्य तसेच केंद्र शासनाच्या वतीने गरीब तसेच गरजूंना मोफत अन्नधान्य देण्याची योजना आहे. मात्र गरजूंना हे अन्न मिळते का, हा प्रश्न आहे. खरोखरच अन्नधान्य गरिबांना मिळाले असते तर आज या दोघींचा भूकबळी गेला नसता. शासन आणि प्रशासन हे केवळ नागरिकांची दिशाभूल करीत असून कमिशनखोरीचे मोठे साटेलोटे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोठारीसारखी घटना इतर कुठेही घडू नये यासाठी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.