शरदचंद्र सालफळे : सूर्यांश पुरस्कार अशोक पवारांना प्रदानचंद्रपूर : जे बोलले जाते, कृती केली जाते. तेदेखील साहित्यच आहे. साहित्य हे कोणाचीही मिरासदारी नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार डॉ. शरदचंद्र सालफळे यांनी केले.सूर्यांश साहित्यिक व सांस्कृतिक मंचाच्या वतीने रविवारी शामाप्रसाद मुखर्जी सहभागृहात साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. सालफळे होते. विशेष अतिथी म्हणून नागपूर येथील कवयित्री मनिषा साधू उपस्थित होत्या. मंचावर प्रमुख पाहुणे नाट्यकर्मी सुनील देशपोंडे, इतिहासतज्ज्ञ अशोकसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.डॉ. सालफळे म्हणाले की, जसे वाङमयीन साहित्य असते. त्याप्रमाणे शिवकाळातील शस्त्र चालविण्याच्या कला या शस्त्र साहित्य होत. नवोदित साहित्यिकांना पुढे आणण्यासाठी विविध साहित्यिक उपक्रम सातत्याने राबविले पाहिजे, असेही आवाहनही त्यांनी केले. नाट्यकर्मी सुनील देशपांडे यांच्या हस्ते बाबुराव कोंतमवार साहित्य सन्मान पुरस्कार म्हणून ‘बिऱ्हाड’कार अशोक पवार यांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळप्रदान करण्यात आले. याशिवाय नवोन्मेष पुरस्कार बीबी येथील कवी अविनाश पोईनकर, दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार प्राचार्य शिवाजी बागल आणि तु. वि. पत्तीवार स्मृती कलायात्री पुरस्कार गायिका सुरेखा दुधलकर यांना देऊन गौरव करण्यात आला. गुलाबराव पेंदाम स्मृती कवितासंग्रह पुरस्कार मुंबईचे कवी भगवान निळे यांच्या ‘सांगायला हवच असं नाही’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला. निळे यांच्या वतीने तो पुरस्कार पत्रकार मिलिंद कीर्ती यांनी स्वीकारला. या प्रसंगी नाट्यकर्मी देशपांडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकाशित पुस्तकांची एक माहिती पुस्तिका प्रकाशित करून त्या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात उल्लेखीत पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्याचे आवाहन केले. संर्यांश पुरस्कार आयोजन समितीचे समन्वयक संजय वैद्य यांनी वैद्य कुटुंबीयांतर्फे पुढील वर्षीपासून निसर्ग कवितांसाठी पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. कवयित्री मनिषा साधू व अशोकसिंग ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. पुरस्कार विजेते अशोक पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, साहित्य सर्वव्यापी असते. साहित्य निर्मितीसाठी ध्यान, चिंतन, मनन करण्याची प्रवृत्ती सकारत्मक हवी. आंतरिक प्रेरणेतून साहित्य निर्माण झाले पाहिजे. साहित्य संवेदना जन्मत:च असणे आवश्यक आहे. जे आयुष्य जगले, तेच लिहिले पाहिजे. त्यातून खरी साहित्य निर्मिती होत असते, असेही पवार यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन दीपक शिव यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख यांनी मानले. (प्रतिनिधी )
साहित्य कोणाची मिरासदारी नाही
By admin | Published: July 04, 2016 12:46 AM