लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसरात सोमवारी एकाच ठिकाणी तब्बल १५ मृत जनावरे आढळल्याने खळबळ उडाली. मात्र, महसूल व पोलीस प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही महिन्यांपासून गोवंश तस्करांच्या आंतरराज्य टोळीने नव्या मार्गाचा वापर सुरू केला. वाहनातून कोंबून नेण्याच्या प्रयत्नात गुदमरून मृत्यू झाल्याने ही जनावरे परिसरातच फेकून तस्करांनी पाेबारा केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसराची व्याप्ती मोठी आहे. या परिसरातून अचानक दुर्गंधी सुटल्याने काही नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दरम्यान, परिसराची पाहणी केली असता अमलनाला धरण प्रकल्प परिसरातील एका खोलगट भागात तब्बल १५ मृत जनावरे फेकून दिल्याचे दिसून आले. गावातील जनावरांचा अपघाती अथवा नैसर्गिक जनावरांचा मृत्यू झाला तरी अशी अवहेलना कुणीही करीत नाही. जनावरांच्या मृतदेहाची मानवी वस्तीपासून दूर व योग्यरीत्या विल्हेवाट लावली जाते. पण एकाच ठिकाणी १५ मृत जनावरे आढळल्याने विविध शंकांना पेव फुटले. जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. धरणाच्या परिसरात मृतदेह फेकणारे काेण, यासारखे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.
गडचांदूरच्या पाणीपुरवठ्याचे काय? लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. अशावेळी ती मृत जनावरे नाल्यातील पाण्याने वाहून धरणात जाऊ शकतात. अमलनाला प्रकल्पातून गडचांदूर व नांदा पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. अशा स्थितीत धरण परिसरात मृत जनावरे टाकणे बंद झाले नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
नागरिक म्हणतात...चौकशी करून कारवाई कराn अमलनाला धरण परिसरात एवढ्या मोठ्या संख्येने मृत जनावरे आढळल्यानंतरही पोलीस, महसूल व पशुसंवर्धन विभागाला काहीही माहिती नाही. त्या जनावरांचा पंचनामा का झाला नाही, असाही प्रश्न पुढे आला. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यापूर्वी इसापूर ग्रामपंचायत हद्दीत टाकली मृत जनावरे
काही महिन्यांपूर्वी इसापूर ग्रामपंचायत हद्दीत मृत जनावरे टाकण्यात आली होती. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी गो-तस्करांना प्रखर विरोध केला. परिणामी, मृत जनावरे बैलमपूर शिवारात टाकणे सुरू झाले. आता अगदी गडचांदूर शहराला लागूनच असलेल्या अमलनाला धरण परिसरात मृत जनावरे टाकल्याने तस्करांवर कुणाचा वरदहस्त आहे की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.