घनश्याम नवघडे
नागभीड : तो सकाळी गायी घेऊन जंगलात गेला; पण सायंकाळ होऊनही परत आला नाही. जंगलात त्याचे वाघाने काही बरेवाईट तर केले नाही ना या शंकेने अख्खे गाव त्याच्या शोधात निघाले; पण तो जंगलात निवांत झोपलेला पाहून सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.
त्याचे झाले असे की, नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील एक गुराखी गावातील गुरे चारण्यासाठी जंगलात नेहमीप्रमाणे घेऊन गेला. दिवसभर त्याने गुरे चारली आणि संध्याकाळच्या सुमारास एका झाडाखाली बसला असताना त्याला अचानक झोपेची डुलकी आली. एवढेच नव्हे तर त्या निरव आणि थंडगार वातावरणात गाढ झोपीही गेला.
इकडे संध्याकाळ होत आल्याने आपल्या घरी परतण्याच्या नियोजित वेळी गुरांनी घराचा रस्ता धरला. गुरे आपआपल्या घरी पोहोचलीही. गुरे घरी आली; पण नेहमीच गुरांच्या मागोमाग येणारा गुराखी मात्र गुरांच्या मागोमाग आला नाही हे काहींच्या लक्षात आले. ही बाब इतरांच्याही लक्षात आणून देण्यात आली. ओवाळा जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या यापूर्वी एक-दोन घटना घडल्या असल्याने गुराख्याचे वाघाने काही बरेवाईट तर केले नसेल ना, अशी अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
बॉक्स
गावातील चौकात जमले गावकरी
गुराखी जंगलातून परत आला नाही, ही बाब संपूर्ण गावभर पसरली. या बाबीची शहानिशा करण्यासाठी गावकऱ्यांनी गावातील चौकात हजेरी लावली. प्रत्येकाच्या तोंडी हाच विषय. तरी पण लोकांनी तो परत येण्याची आणखी अर्धा तास वाट पाहिली; पण गुराखी आलाच नाही. आता मात्र गावकऱ्यांचा धीर संपला आणि त्यांनी जंगलाचा रस्ता धरला व त्या गुराख्याचा शोध घेऊ लागले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर तो गुराखी एका झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत दिसला. तरीही वाघाच्या भीतीची अनेकांच्या मनात शंका आलीच. यातील काहींनी धाडस एकवटून ते गुराख्याजवळ गेले असता तो खरोखरच झोपला असल्याचे दिसून आले.