लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : श्रावण महिन्यापासून विविध सणांना प्रारंभ होतो. ऑगस्टमधील ५ तारखेपासून श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून, सप्टेंबर महिन्याच्या ७ तारखेला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.
गणेशोत्सवाला ९ दिवसांचा कालावधी असला तरी मागील एक ते दीड महिन्यापासून भव्यदिव्य मंडप, आकर्षक देखावे सादर करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप बांधकामाला सुरुवात झाली आहे. अशावेळी गणेश मंडप टाकण्यापासून अनेक प्रकारची परवानगी घेण्यासाठी मंडळांकडून तयारी केली जाते. शहराला गणेशोत्सवाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे.
यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांकडून हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या उत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. तर मूर्तिकारसुद्धा गणरायाच्या मूर्ती साकारण्यासाठी दिवसरात्र एक करून काम करताना दिसत आहेत. यावर्षी गणेशोत्सवासाठी महापालिकेनेही तयारी सुरु केली आहे. चांदा क्लब ग्राऊंडवर गणेशमूर्ती विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
परवानगीसाठी अर्ज कसा कोठे कराल? सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिका तसेच अन्य विभागांची परवानगी घेणे गरजेचे असते. यासाठी विविध विभागांकडे अर्ज करावा लागतो. यामध्ये पोलिस, महापालिका, वीज मंडळ, अग्निशमन विभाग, धर्मादाय आयुक्तांकडे विविध परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना त्रास होऊ नये. त्यांना एका ठिकाणीच सर्वच परवानगी मिळाली यासाठी महापालिकेना एक खिडकी योजना सुरू केली आहे.
कागदपत्रे काय लागतात? परवानगीसाठी ऑनलाइन, ऑफलाइन अर्ज करता येतो. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाचे नाव, अध्यक्ष व कार्यकारिणीचा उल्लेख करावा लागतो, ज्या ठिकाणी मंडप टाकायचा आहे त्या जागेचा उल्लेख करणे गरजेचे आहे. धर्मादाय कार्यालयाची परवानगीही महत्त्वाची आहे.
विजेसाठी सवलत
- महावितरणकडून दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळांना मागणीनुसार वीजपुरवठा करतात.
- अनेकवेळा सवलतीच्या दरात वीजजोडणी करून दिली जाते. त्यासाठी अर्ज करावा लागतो.
मंडप टाकण्यासाठी यांची परवानगी आवश्यक
- पोलिस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे भव्यदिव्य कार्यक्रम राहतात. त्या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी पोलिस प्रशासनाची परवानगी घेणे गरजेची आहे.
- महापालिका : रस्त्यात किंवा सार्वजनिक खुल्या भूखंडाच्या ठिकाणी मंडप उभारण्यासाठी गणेश मंडळांना महापालिकेची परवानगी बंधनकारक आहे.