राजेश मडावी
चंद्रपूर : रशियातील सेंट पीटस्बर्ग येथील २०१० च्या जागतिक अजेंडानुसार २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पटीने वाढविण्यावर जगभरात काम सुरू झाले. त्याप्रमाणे,भारतातही सर्व व्याघ्र प्रकल्पांत अंमल होत असताना महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने मात्र वाघांच्या संख्येत आघाडी घेण्याचे कारण काय,असा प्रश्न देशभरातील क्षेत्र संचालकांनी शुक्रवारी चंद्रपुरातील वन अकादमीत झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात उपस्थित केला.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण,महाराष्ट्र वनविभाग चंद्रपूर व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रासाठी पुढाकार घेतला होता. विविध राज्यांतील मुख्य वन्यजीव संरक्षक तसेच देशभरातील ५२ क्षेत्र संचालक व तज्ज्ञांनी बदलत्या आव्हानांवर विचारमंथन केले. महाराष्ट्रात बोर,मेळघाट,पेंच,नवेगाव नागझिरा,सह्याद्री,ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पात २०१४ मध्ये १९० वाघ होते ते वाढून २०२० मध्ये ३४० पर्यंत पोहोचले. राज्यातील एकूण वाघांपैकी सुमारे २५० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. वाघांच्या या संख्येमुळे महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून आता चौथ्या स्थानावर आला आहे.
संधी व संकटांकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले
ताडोबात वाघांची संख्या झपाट्याने का वाढली, हा प्रश्न देशभरातील क्षेत्र संचालकांनी चर्चासत्रात उपस्थित केल्यानंतर ताडोबाची क्षेत्र पाहणी करून कोअर व बफर झोनचे स्वरूप जाणून घेतले. सर्वच प्रकल्पांत वाघांची संख्या वाढविण्यावर भर देणे सुरू असताना ताडोबात झपाट्याने वाघ वाढले. तर दुसरीकडे मानव व वन्यजीव संघर्ष टोकदार का झाला, याची कारणे जाणून घेतली. तेलंगणाचे विनोदकुमार,डेहराडूनचे रमेशकुमार,डॉ.कौशिक,राजेश गोपाल,सातपुडा फाउंडेशनचे किशोर रिठे,कमल कुरेशी,डॉ. तिलोतमा वर्मा आदींनी समस्यांवर शास्त्रशुद्ध प्रकाश टाकून संधी व संकटांची जाणीव करून दिली.
महाराष्ट्रातील वाघांची स्थिती
२००६-१०३
२०१०-१६८
२०१४ -१९०
२०२०- ३४०
मानव व वन्यजीव संघर्ष कमी कसा होईल, पर्यायी रोजगार संधी विकसित कशा होतील यावर चंद्रपुरात सखोल चर्चा झाली. अनेकांनी नवे मुद्दे मांडले. सातपुडा फाउंडेशनमुळेे मेळघाटात २० वर्षांत २२ गावांचे पुनर्वसन व २५०० हेक्टर जमीन वन्यजीवांना मोकळी झाली. त्यातील ५ गावांच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल चर्चासत्रात प्रकाशित झाला. हा अहवाल सर्वच प्रकल्पांसाठी दिशादर्शक आहे.
-किशोर रिठे,सदस्य,वन्यजीव मंडळ,महाराष्ट्र राज्य