लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये विविध घटनेत अनेकांनी नैराश्यातून स्वतःला संपविल्याच्या घटना घडल्या आहेत. आत्महत्येत पुरुष असो की महिला या दोघांचेही प्रमाण पाहता यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. विशेषतः महिलांच्या तुलनेत पुरुष आत्महत्येच्या घटना अधिक असल्याचे मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांतून दिसून येते.
जिल्ह्यातील मागील काही वर्षात झालेल्या आत्महत्येच्या घटना पाहता यात तरुण मुला-मुलींनीसुद्धा जीवन संपविल्याचे समोर आले आहे. अभ्यासाचे कारण, शिवाय मार्क कमी पडल्याने तसेच आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्य रागावल्याने, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कमी पडल्याने मुला-मुलींकडून अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. दुसरीकडे घरातील वाद, मतभेद, भांडण, शिवाय शेती, पैसा अशा संपत्तीच्या कारणातून सुद्धा काही जण आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलतात. किरकोळ बाबीमुळे शारीरिक व्याधीसह मानसिक आजारांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.
कारण काय ?आत्महत्येमागे असणाऱ्या विविध कारणांमध्ये नैराश्य, व्यसनाधीनता, मानसिक आजार, ताणतणाव, आर्थिक विवंचना, बेरोजगारी, कौटुंबिक कलह, प्रेम, विरह या प्रमुख कारणांचा समावेश होतो. आत्महत्या ही विविध कारणामुळे घडून येणारी घटना आहे. बऱ्याचशा आत्महत्या नैराश्यामधून घडतात.
मागील काही वर्षांत वाढल्या आत्महत्या
- मागील काही वर्षांमध्ये अनेकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे दिसून येते. काही जण व्यवसाय बंद पडल्याने किंवा नोकरी गेल्याने निराश होतात. तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याने अनेक जण हताश होतात.
- या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे, या विवंचनेत काही जण टोकाचे पाऊल उचलतात आणि आपले जीवन संपविण्याचा विचार करतात.
जीवन अनमोल आहेआत्महत्येचा विचार मनात येत असेल तर सर्वप्रथम त्याबाबत कुणाजवळ तरी बोलून दाखवावे. जीवन अनमोल आहे. त्याचा आनंद घ्यावा. जीवनातील समस्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. त्यावर कायमचा उपाय करू नये, समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी, गरज असल्यास औषधोपचार घ्यावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.
आत्महत्या करण्यात पुरुषांचे प्रमाण जास्त ?महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण आत्महत्येच्या बाबतीत जास्त असल्याचे विविध आकडेवारीवरून दिसून येते. पोलिस दलाकडे आत्महत्या किंवा अन्य प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली जाते. ताणतणाव असेल तर यातून मार्ग काढता येते.