चंद्रपूर : अन्य कुण्या गटातटाला समर्थन देण्यापेक्षा आपल्या पक्षाचाच महापौर चंद्रपूर मनपामध्ये बसवायचा, अशी भावना आता भाजपा नगरसेवकांमध्येही प्रबळ होत आहे. तर दुसरीकडे भाजपाचे समर्थन मिळवू पहाणाऱ्या महापौरांच्या गटाला मात्र यामुळे हादरा बसला आहे. चंद्रपूर मनपाच्या राजकारणात निर्माण झालेल्या या स्थितीमुळे आपल्या गटाला भाजपाची खरेच साथ मिळणार का, अशी शंका आता महापौरांच्या गटात व्यक्त व्हायला लागली आहे.चंद्रपूर मनपातील महापौर पदाची निवडणूक ३० आॅक्टोबरला होत आहे. तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे मनपाच्या राजकारणात काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आपल्याच पक्षाचा महापौर हवा, अशी भावना भाजपाच्या गोटात प्रबळ होत आहे. एवढेच नाही तर, काही नगरसेवकांनी आपली भावना पक्षनेत्यांकडे व्यक्त करून, काँग्रेसमधील अन्य गटाला समर्थन देण्यापेक्षा आपल्याच पक्षाचा महापौर का होऊ नये, अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. अंजली घोटेकर यांचे नाव महापौर पदाच्या उमेदवार म्हणून जवळपास पक्केही झाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी भाजपाने महापौरांच्या गटाला समर्थन देण्याची तयारी दर्शविली होती. राखी कांचर्लावार यांच्यासाठी समर्थन देण्याची तयारी झाली होती. मात्र पक्षाचा हा निर्णय काही भाजपा नगरसेवकांना रूचलेला नव्हता. त्यामुळे नगरसेवकांच्या आणि पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडून व्यक्त होणारी भावना लक्षात घेता, महापौरपदाच्या रिंगणात भाजपाही उतरत आहे.भाजपा नगरसेवकांनी महापौर आपल्या पक्षाचा हवा, असा सूर लावून धरला आहे. या पार्श्वभूमिवर भाजपाच्या नगरसेविका अमरजितकौर धुन्ना यांनी, आपल्या पक्षाची नगरसेविकाच महापौर होईल, असे एका पत्रकातून स्पष्ट केले आहे. मनपाच्या निवडणुकीत भाजपाने स्वपक्षातील उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा हा निर्णय भाजपा नगरसेवकांना मान्य असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. आपल्या पक्षातील सर्व १७ सदस्य एकत्र असून अन्य पक्षातील गटाच्या उमेदवाराला समर्थन करण्याची पाळी येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. नगरसेविका धुन्ना यांच्यासारखीच अन्य नगरसेवकांचीही भावना आहे. भाजपात सुरू असलेल्या या बदलामुळे काँग्रेसमधील महापौरांचा गट मात्र अस्वस्थ आहे. असे असले तरी, तडजोडीच्या राजकारणात या गटानेही कंबर कसली आहे. अन्य पक्षातील असंतुष्ट नगरसेवक आणि अपक्षांच्या मदतीने आपल्या गटाचा नगरसेवक महापौरपदी निवडून येईल असा विश्वास या गटाकडून व्यक्त होत आहे. या सोबतच, भाजपाच्या १७ नगरसेवकांची साथ कशी मिळविता येईल, या दृष्टीनेही या गटाचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
दुसऱ्याला समर्थन कशाला, महापौर आमचाच हवा !
By admin | Published: October 26, 2014 10:38 PM