चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट आले आहे. असे असले तरी इतर विभागांच्या तुलनेमध्ये जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्यामुळे सद्य:स्थितीत शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यातील पगार आयकर भरण्यामध्ये गेला. त्यातच मार्च आणि एप्रिलचेही वेतन अद्याप शिक्षकांच्या हातात पडले नाही. इतर विभागांचे वेतन वेळेवर होत असताना आमच्यावरच अन्याय का, असा प्रश्न सध्या शिक्षक उपस्थित करीत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे सर्वच जण सध्या अडचणीत सापडले आहे. इतरांच्या तुलनेमध्ये शिक्षकांची आर्थिक स्थिती बरी असल्याने त्यांच्यामध्ये समाधान व्यक्त केले जात होते. मात्र नियमित वेतनच होत नसल्यामुळे त्यांनाही आता आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. घर, वाहन तसेच इतर कर्ज फेडणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे अतिरिक्त व्याजही भरावे लागत आहे. इतर विभागांप्रमाणे शासनाने आम्हालाही वेतन वेळेवर द्यावे, अशी शिक्षकांची मागणी आहे. विशेष म्हणजे, शासन निर्णयानुसार शिक्षकांचे वेतन १ तारखेला होणे अपेक्षित आहे. मात्र हातात कधीच एक तारखेला वेतन मिळत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातील वेतन आयकर भरण्यामध्ये गेला आहे. त्यातच घरूनही काही पैसा भरून द्यावा लागला आहे. त्यामुळे या महिन्यासह मार्च आणि एप्रिलचेही वेतन मे उजाडला असतानाही झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. यातच काही शिक्षकविरोधी नागरिक शिक्षकांच्या वेतनावरून समाजमाध्यमांवर उलटसुलट आरोप करीत असतात. मात्र शाळा सुरू नसतानाही अनेक कामे केली असून ऑनलाईन अभ्यासक्रमासोबत प्रशासनाने सांगितलेले प्रत्येक कामे केल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर मागील लाॅकडाऊनमध्ये रस्त्यावर उभे राहून वाहनांची तपासणी, साॅरीचे सर्व्हेक्षण, विद्यार्थ्यांना शालेय पोषण वितरण तसेच यावर्षीही कोरोना कंट्रोल रूममध्ये काही शिक्षक आपली सेवा बजावत आहे. त्यामुळे शिक्षकांबद्दल गैरसमज करू नये, असेही शिक्षकांचे म्हणणे आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील जि.प. शाळा १५८०
एकूण शिक्षण
५०००
--
बाॅक्स
सीएमपी प्रणालीद्वारे वेतन करावे
शिक्षकांचे दोन ते तीन महिन्यांत उशिराने पगार होतो. त्यामुळे वेतन वेळेवर होण्यासाठी काही जिल्ह्यांनी सीएमपी प्रणालीचा स्वीकार केला आहे. या प्रणालीनुसार जर शिक्षकांचे वेतन दिले तर ते अगदी वेळेवर होतील, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
कोट
घराचे हप्ते वेळेवर कसे फेडणार?
शिक्षकांचे वेतन नियमित होत नसल्याने शिक्षकांनी पतसंस्था तसेच इतर बँकांकडून घेतलेल्या कर्जावर व्याजाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. एलआयसीचा हप्ता वेळेवर पोहोचला नाही. फेबुवारीच्या पगारातून आयकर कपात झाल्याने व मार्च, एप्रिलचे वेतन रखडल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार नियमित पगाराची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- सुधाकर दौलत पोपटे, जिल्हाध्यक्ष
प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ, चंद्रपूर
कोट
नियमित शिक्षकांचे अनियमित वेतन ही नेहमीचीच समस्या झाली आहे. शिक्षक संघटनांनी अनेक वेळा वरिष्ठ स्तरावर नियमित वेतन होण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. परंतु प्रशासन नेहमीच आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहे. पगार उशिरा होत असल्यामुळे अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्च, एप्रिल महिन्यांतील वेतन त्वरित करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे.
- उमाजी काेडापे
जिल्हा सरचिटणीस म. रा. प्राथमिक शिक्षक समिती, चंद्रपूर
कोट
मागील वर्षीच्या कोरोना उद्रेकापासून आवश्यक तितकी वेतनासाठी तरतूद प्राप्त नाही. आतासुद्धा एप्रिल २०२१ च्या वेतनाकरिता १५ कोटी इतकी तरतूद आवश्यक असून तीही उपलब्ध झाली नाही. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. वेतन उशिरा होत आहे, ही परिस्थिती इतर सर्वच जिल्ह्यांमध्येही आहे.
- राहुल कर्डिले
मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर
कोट
शिक्षकांचे वेतन फारच इशारा होत असल्यामुळे, शिक्षक पतसंस्था व इतर बँकांचे गृहकर्जाचे व्याजाचा भुर्दंड पडतो. कुटुंबाला आर्थिक अडचण सहन करावी लागते.
- श्याम लेडे
अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी, अधिकारी, कर्मचारी महासंघ, चंद्रपूर