फोटो :
बल्लारपूर : माझ्या पतीच्या बलिदानाचा अभिमान आहे. पतीचे स्वप्न होते की, आमच्या दोन वर्षाच्या मुलीला यशस्वी करायचे आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मी संकल्प केल्याचे मत वीरपत्नी एकता घोडमारे यांनी व्यक्त केले.
आदर्श मित्रमंडळ, पुणे, सेवा मित्रमंडळ, पुणे आणि श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या शूर सैनिकांच्या १९२ कुटुंबीयांचा नुकताच सत्कार केला. शहीद जवानांच्या कुटुंबांना स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बल्लारपूर येथील शहीद अमर वीर जवान नितीन टिळकचंद घोडमारे यांची पत्नी एकता नितीन घोडमारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रध्वज तिरंगा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, विकास राजूरकर, अरुणा राजूरकर, वर्षा सुंचुवार, रवी पिंपळकर, रामेश्वर पासवार, कुलदीप सुंचुवार, पोलीस कर्मचारी रवी चेरपूरवार, निर्मला नन्नावरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी ठाणेदार उमेश पाटील म्हणाले, पोलीस जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्वांना पोलीस विभागातर्फे सर्वतोपरी मदत केली जात आहे. श्रीनिवास सुंचुवार यांनी सूत्रसंचालन केले. विकास राजूरकर यांनी आभार मानले.
बाॅक्स
अमर वीर जवान नितीन घोडमारे १ मे २०१९ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा येथे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले. वीरपत्नी एकता यांना दोन वर्षांची मुलगी आहे. वडील परत येतील, याची ती वाट बघत आहे.