बल्लारपूर : पती हा बरोबर नोकरी करीत नाही. त्याला जीवनातून संपवायचे व त्याच्या जागेवर आपण नोकरी बळकावून प्रियकरासोबत आपला संसार थाटायचा, अशी योजना आखून प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या बायकोला, सासूला, प्रियकराला व एका व्यक्तीला पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी २४ तासांत अटक केली.
संजय मारोती टिकले (रा. नकोडा), त्याचा साथीदार विकास भास्कर नगराळे (२३, रा.नकोडा), पत्नी प्राजक्ता उर्फ राणी मारोती काकडे (२५) व सासू कांता देवानंद भसाखेत्रे (४१, रा. पंचशील चौक, घुटकाळा, चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत.
गुरुवारी रात्री सास्ती मार्गावर असलेल्या वर्धा नदीच्या पुलाच्या अलीकडे रस्त्याच्या बाजूला मारोती शंकर काकडे हा मृतावस्थेत आढळला होता. त्याचा गळा कापलेला होता. तत्काळ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी घटनास्थळावर जाऊन तपास सुरू केला. मृताच्या आईकडून माहिती घेतली. मृत मारोती शंकर काकडे हा सास्ती भूमिगत खदानीत काम करीत होता. घटनेच्या दिवशी तो घरीच होता. त्याला नकोडा येथील विकास नगराळे याने भूलथापा देऊन बाहेर नेले. त्यांच्या मागे मुख्य आरोपी संजय टिकले हा पाठलाग करीत होता व सास्तीच्या रस्त्याने फिरवून त्याला दारू पाजून चंद्रपूरमार्गे नकोडा येथील एसीसी सिमेंट उद्योगाला लागून असलेल्या गुप्ता वॉशरीजच्या पाईपलाईनजवळ नेत मारोतीचा गळा दाबून ठार मारले व नंतर त्याचा गळा चिरला. कटात ठरल्याप्रमाणे मारोतीचा मृतदेह सास्ती मार्गावर आणून रस्त्यावर फेकण्यात आला. या कटाचा उद्देश असा होता की मृताचा अपघात दाखवून त्याची नोकरी त्याच्या पत्नीला मिळावी व नंतर आपला संसार थाटावा. परंतु आरोपींचे मनसुबे उलटे झाले.
बॉक्स
पत्नीच्या मोबाईलवर प्रियकराचे १५ दिवसांत ३५० कॉल
पोलिसांनी जेव्हा मृताची पत्नी प्राजक्ता काकडे हिचा मोबाईल ट्रेस केला, तेव्हा तिच्या मोबाईलवर संजय टिकले याचे १५ दिवसांत ३५० वेळा कॉल आल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसी इंगा दाखविताच आरोपींनी कट रचल्याची माहिती पोलिसांना दिली. या कटात मृताची सासूही सहभागी असल्याची माहिती समोर आली.