लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : दरवर्षी शेतकरी शेतात उत्पन्न घेण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेऊन पीक निघेपर्यंत जिवापाड कष्ट घेतात. महत्त्वाचे म्हणजे रब्बी हंगामात पिकांची वन्यप्राण्यांपासून जास्त काळजी घ्यावी लागते. तरीही शेतकऱ्यांना रात्री रानडुकरांचा त्रास व दिवसा वानरांचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील पाच वर्षांत बल्लारपूर तालुक्यातील १३९२ शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान झाल्याचे अर्ज केले व बल्लारपूर वनखात्याने त्यांना ४ कोटी १० लाख ८ हजार ५६४ रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याची बाब सातत्याने शासनाच्या निदर्शनास येत होती. त्यासाठी रानडुक्कर व रोही या प्राण्यांची पारध करण्याची पद्धती सुलभ करण्याचा निर्णय शासनाने २०१५ रोजी घेतला व या प्राण्यांपासून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने वनपालांकडे केली.बल्लारपूर तालुक्यात आठ हजारांच्या वर शेतकरी आहेत; परंतु रब्बीचे पीक घेणारे शेतकरी फार कमी आहे. पळसगाव, आमडी, इटोली, मानोरा केम, कळमना ही गावे जंगलाला लागून असल्यामुळे रात्री येथील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस असतो. शेतकऱ्यांना रात्र शेतात काढावी लागते, तरीसुद्धा रानडुक्कर व अन्य प्राणी शेतात घुसून पिकांची नासधूस करतात. अलीकडे शेतात वानरांची टोळी शिरून पिकांचे नुकसान करू लागली आहे. अशा वन्यप्राण्यांपासून सुटका व्हावी, शेतपिकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेमधून शेतकऱ्यांना सोलार कुंपणाची योजना सुरू केली. या योजनेचा फायदा बल्लारपूर तालुक्यातील २८१ शेतकरी बांधवांना मिळाला आहे. पळसगाव, आमडी, किन्ही, केम या गावांनाही मिळणार आहे.
सोलार कुंपण लावल्यामुळे रात्री शेतात शिरणाऱ्या वन्यप्राण्यांना सौम्य झटका बसतो व ते दुसऱ्यांदा त्या परिसरात फिरकत नाहीत. या योजनेंतर्गत पहिल्यांदाच बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोलार कुंपण वाटप करण्यात आले असून, याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. -संतोष थिपे, वन परिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह
शेतीचा बहुतांश भाग हा जंगलाने वेढलेला असतो. त्या भागात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असतो. यामुळे रानडुकरांचा कळप नेहमीच धुडघूस घालतो. सोलार कुंपणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. -पवन साळवे, शेतकरी, बामणी