- राजेश मडावी
चंद्रपूर : बुद्ध पौर्णिमेच्या रात्री शुक्रवारी (दि. ५) ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअरझोन मध्ये ७१ मचाणींवरून झालेल्या वन्यप्राणी गणनेमध्ये ३३ वाघ, १६ बिबट तर २५ अस्वल आढळून आले. २ हजार ३६० तृणभक्षी व अन्य वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली असून, ही संख्या समाधानकारक आहे. मात्र वाघ व बिबट्यांची नोंदीत घट दिसून आली आहे.
मे महिन्याच्या सुरूवातीला ताडोबात सर्वात जास्त पाऊस झाल्याने जंगलातील नाले व अन्य ठिकाणी पाणी भरल्याने पाणवठ्यांकडे वाघ, बिबटे फिरकले नाहीत. त्यामुळेच वाघ व बिबट्यांच्या गणनेत घट आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा प्रकल्प देशभरात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे. या ठिकाणी बफर आणि कोअर असे दोन झोन आहेत. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री या ठिकाणी वन्यप्राणी गणनेचा निसर्गानुभव कार्यक्रम होतो. शुक्रवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री बफर झोनमध्ये निसर्गप्रेमी व अशासकीय संस्थांच्या माध्यमातून तर कोअर झोनमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी गणना केली. ताडोबातील पाणवटे, रस्त्याच्या कडेला व अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या ७१ मचानी वरून ही गणना सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजता दरम्यान करण्यात आली.
२६ हजार ३६० तृणभक्षींची नोंदवन्यप्राणी गणनेत ताडोबाच्या बफर व कोअर झोनमध्ये ३३ वाघ, १६ बिबटे, २५ अस्वलाची नोंद घेण्यात आली आहे. २६ हजार ३६० तृणभक्षी व अन्य प्राण्यांची नोंद झाली आहे. कोअर झोनमध्ये अधिकाऱ्यांनी केलेल्या गणनेत १९ वाघ, ४ बिबटे व २० अस्वल आढळून आले. बफर झोनमध्ये निर्सगप्रेमी व अशासकीय संस्थांनी केलेल्या गणनेत१४ वाघ, १२ बिबटे व ५ अस्वल आढळून आले. तृणभक्ष्यी व अन्य प्राण्यांमध्ये कोअर झोन मध्ये रानगवा ८७, चितळ ८७२, सांभर १६४, निलगाय ७, रानकुत्रे ४५, तर २३८ रानडुकरांची नोंद करण्यात आली आहे. बफर झोनमध्ये रानगवा ११५, चितळ ४२१, सांभर १३५, निलगाय ३९, रानडुकरे २३७ तर रानकुत्र्यांची संख्या शून्य आहे.
वाघ व बिबट्याच्या नोंदीवर वातावरण बदलाचा परिणामकोअरमध्ये १४१३ तर बफरझोनमध्ये ९४७ वन्यप्राणी आढळून आले. वाघ, बिबट व अस्वलाची संख्या घेतली तर कोअर झोनमध्ये १४५६ तर बफरमध्ये ९७८ वन्यप्राण्यांची एकूण नोंद झाली. निलगायी झुडपी व विरळ जंगलात किंवा गावाशेजारी राहतात. त्यामुळे कोअर झोनमध्ये निलगायींची संख्या फक्त ७ आहे. तृणभक्षींसह अन्य वन्यप्राण्यांच्या नोंदी समाधानकारक आहेत; परंतु वाघ व बिबट्यांच्या नोंदीवर बदललेल्या वातावरणाचा परिणाम आढळून आला आहे.