लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वन्यप्राण्यांमुळे दरवर्षी शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान केले जाते. शेतकरी शेतात दिवसरात्र मेहनत करून पिकांना जिवापाड जपत असतात. परंतु वनविभाग वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी असफल ठरला असून पिकांमध्ये वन्यप्राणी भरदिवसा धिंगाणा घालत असल्याने शेतकºयांच्या हातात येणारे पीक डोळ्यांदेखत प्राणी उदध्वस्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून वनविभागाने वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी हातात येणारे पीक वन्यप्राणी भरदिवसा डोळ्यांदेखत उदध्वस्त करीत असतात. परंतु वनविभागाने यावर अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. त्यामुळे दरवर्षी वन्यप्राण्यांकडून शेतीचे अतोनात नुकसान केले जाते. वन्यप्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. सध्या पीक फळधारणेवर आले आहे. सोयाबीन पीक कापणीला आले तर कपाशीला बोंडे लागली आहे. पीक शेतकºयांच्या हातात आले असले तरी अजूनही बहुतांश पीक शेतात आहे. मात्र वन्यप्राणी भरदिवसा शेतात धिंगाणा घालून पीक उदध्वस्त करीत आहे. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी प्रभाकर जुनघरी, बंडूजी बोभाटे,भास्कर जुनघरी,विकास पिंपळकर,श्रीधर जुनघरी,प्रमोद लांडे, सुनील देळवाकर, मंगेश जुनघरी, राजेश्वर कुंचेवार,चेतन बोभाटे,निखिल लांडे,तुषार लोहे, केतन बोभाटे,भूषण जुनघरी व शेतकºयांनी केली आहे.
नुकसान भरपाई नको, बंदोबस्त कराशेतकरी उसनवारी व कर्ज काढून शेतीवर मोठया प्रमाणात दरवर्षी खर्च करीत असतात. मात्र वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकºयांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. नुकसान भरपाई म्हणून शासन शेतकºयांना नाममात्र भरपाई देऊन मोकळे होतात. नुकसान लाखाचे आणि मदत हजारात अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्हाला मदत नको वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, असा केविलवाणा सूर शेतकरीवर्गात उमटायला लागला आहे
वेकोलिचे ढिगारे झाले झुडुपी जंगलराजुरा तालुक्यातील बहुतांश भाग झुडपी जंगलाने व्यापला आहे. सोबतच गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी, वरोडा परिसरात मोठया प्रमाणात वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा उत्खननासाठी वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे शेतीच्या परिसरात टाकल्यामुळे या मातीच्या महाकाय ढिगाºयावर झुडपी जंगल तयार झाल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असतो. भरदिवसा वन्यप्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करीत असल्याने हातात येणारे पीक नष्ट होत आहे.