चंद्रपूर : जंगलव्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वगळता उर्वरीत भागात जंगल विरळ आहे. विरळ जंगलातील नैसर्गिक पाण्याचे साठे फेब्रुवारी महिन्यापासून आटायला लागतात. पानवठ्याचीही अशीच काहीशी स्थिती असते. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाच्या दिशेने येत असतात. यातून वन्यप्राणी हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गावाला लागून असलेले तलाव, नाल्याच्या परिसरात ठाण मांडून बसतात. गावकरी इंधनासाठी वृक्षतोड करतात. त्यांच्यासोबतच तस्करांनीही जंगलावर हात साफ करणे सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात गावाशेजारीत जंगल सपाट झाले आहे. जंंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाल्याने तृणभक्षी प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे हिंस्त्र प्राणी गेल्या काही वर्षांपासून गावात येत आहेत. गावातील सर्व घाण गावाबाहेर फेकली जाते. बाहेरच अनेकजण शौचास बसतात. या कचर्याच्या परिसरात कुत्र्याचा वावर असतो. कुत्रे आणि माकड बिबट्याचे सर्वात आवडते खाद्य आहे. माकडे हाती लागत नाही. मात्र कुत्रे सहज मिळतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाणी आणि शिकारीच्या शोधात बिबटे गावाशेजारी येऊ लागले आहेत. अशुद्ध वातावरणासोबतच जंगलात लावण्यात येणार्या आगीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे रस्तेच बदलत चालले आहेत. आगीच्या भितीपोटी बिबटे, वाघ, गावात येतात. पाण्याचे स्त्रोतही आटायला लागतात. त्यामुळे पाणी आणि भक्ष्याच्या शोधात वन्यप्राणी भटकत असतात. या भटकणार्या कालावधीत त्यांची गाठ कित्येकदा मानवासोबत पडते. उन्हाळ्याच्या दिवसात मोहफुल संकलनासाठी जाणार्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पावसाळ्यात पाळीव प्राण्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मानव वन्यजीव संघर्षात महत्वाचा प्राणी बिबट्या आहे. बिबट्या कुठल्याही परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीलगत असलेल्या जंगलसदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता, घाण व उरीकडे असेल तिथे या प्राण्याची संख्या अधिक असते. (शहर प्रतिनिधी)
पाण्याअभावी वन्यप्राणी-मानव संघर्ष
By admin | Published: May 11, 2014 11:27 PM