सुभाष धोटे : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे बांधकाम सुरू
जिवती : तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर आहोत. या तालुक्यातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव झटणार, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले.
सोबतच जिवती तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या मालकी हक्कासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते शंकरपठार ते घोडणकप्पी रस्त्याच्या व समाजभवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. शंकरपठार ते घोडणकप्पी या रस्त्याचे काम एक कोटी २० लाख रुपये व पाटागुडा ते कुंभेझरी या रस्त्याचे काम दोन कोटी ६४ लाख रुपये तसेच शंकरपठार व पाटागुडा येथील प्रत्येकी पंधरा लाख रुपयांच्या समाजभवनाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रा. सुग्रीव गोतावळे, देवीदास साबने, माधव डोईफोडे, सीताराम मडावी, गणपत आडे, दत्ता राठोड, शंकर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.