चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना जाहिरातींचे पत्रक चिकटविण्यात येतात. त्यामुळे एसटीच्या बाह्य भागासह अंतर्गत भागाचेही विद्रुपीकरण होत आहे. महामंडळाच्या बस फुकटात जाहिराती लावण्याचे साधन ठरत असून यावर कारवाई होत नसल्याने या खाजगी जाहिरातदारांचे मात्र चांगलेच फावत असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे मात्र परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसत आहे. बरेचदा खाजगी जाहिरातदारांकडून बसच्या दर्शनी भागावरही पत्रक लावले जातात. उत्पादनांच्या जाहिरातीचे फलक चिकटवून महामंडळ प्रशासनाने लावलेल्या महत्त्वाच्या सूचनाही यामुळे झाकल्या जातात. राज्य परिवहन महामंडळाकडून बसच्या दर्शनी भागात व्यावसायिक व शासकीय उत्पादनांच्या जाहिराती लावण्यात येतात. याबाबत एसटी महामंडळासोबत ठराविक कालावधीकरिता व्यावसायिक करार केला जातो. यातून एसटीला उत्पन्नही मिळते. तर हरविलेल्या व्यक्ती संदभार्तील सूचना तसेच सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या माहिती संदभार्तील फलक बसच्या बाह्य व अंतर्गत भागावर लावण्यात तितकेसे वावगे ठरणारे नाही. मात्र, अनेक उत्पादक आपल्या वस्तूच्या प्रसिद्धीसाठी परवानगीविनाच जाहिराती लावत असल्याने एसटीचे विद्रुपीकरण झाले आहे. यांच्यावर कारवाई गरजेची आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बसगाड्यांचे विद्रुपीकरण थांबणार का ?
By admin | Published: January 13, 2015 10:56 PM