बल्लारपूर पेपर मिल : कामगारांची यज्ञाची तयारी बल्लारपूर : सध्या उत्पादन बंद असलेल्या येथील बल्लारपूर पेपर मिलचे कर्मचारी मिलवरील संकट दूर व्हावे, याकरिता १० व ११ जानेवारीला यज्ञ करणार आहेत. त्याची तयारी त्यांनी चालविली आहे.बल्लारपूरची अर्थवाहिनी असलेली बल्लारपूर मिल गेल्या काही महिन्यांपासून बंद - सुरू अशा स्थितीतून जात आहे. गेल्या एक महिन्यापासून उत्पादन पूर्णत: बंद असून ते परत कधी सुरू होणार, याची शाश्वतीच नाही. कामगारांचे तीन महिन्यांचे पगार अडले आहेत. मिलवर आलेले हे संकट दूर व्हावे आणि मिलची स्थिती पूर्ववत चांगली व्हावी, याकरिता या मिलमधील भाविक कामगार यज्ञ करीत आहेत. हा यज्ञ १० व ११ जानेवारीला पेपर मिल समोरील श्रीगणेश मंदिरात होणार आहे. त्याकरिता श्री. श्री. पराशर पट्टाभिरामाचार्य येथे येणार आहेत. तशा माहितीचे बॅनर पेपर मिल परिसरात थापर गेट समोर, पेपर मिल मजदूर सभेच्या कार्यालयाजवळ लावण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पेपर मिलचे भवितव्य अधांतरी अडकले आहे. मिलच्या सध्याच्या स्थितीमुळे घाबरलेल्या भाविक कामगारांना आध्यात्मिकतेचा हा पर्याय सूचला आहे. (तालुका प्रतिनिधी)
यज्ञ केल्याने संकट दूर होणार काय?
By admin | Published: January 09, 2017 12:40 AM