लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री केली जाणार आहे. त्यासाठी किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठे असावे, ही अट आहे. यासाठी एक शोकेस बनवून वाइन विक्री करता येणार आहे, परंतु सरसकट सर्व किराणा दुकानातून दारू मिळणार, असा अर्थ काढून काही मंडळी विरोध करीत आहेत. किराणा वस्तू घेण्यासाठी जाणारा प्रत्येक व्यक्ती वाइनच विकत घेतो, हे म्हणणे अर्थसत्य असल्याचे मत किराणा दुकानदारांनी व्यक्त केले.सरकारने मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला. दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून, दारूचे नवीन दर जाहीर केले होते. किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यावरून मतेमतांतरे उमटत आहेत. जिल्ह्यात भाजपने राज्य सरकारविरुद्ध आंदोलन करून विरोध केला. याबाबत चंद्रपूर, बल्लारपूर, दुर्गापूर व बंगाली कॅम्प, भद्रावती येथील किराणा दुकानदारांची मते जाणून घेतली. भाजपने गोवा, हिमाचल प्रदेश राज्यात हे धोरण आधीच लागू आहे. मात्र, महाराष्ट्रात विरोध होत असल्याने बाबूपेठातील एका किराणा दुकानदाराने आश्चर्य व्यक्त केले.
अटींची प्रतीक्षा करायला हवी
- सरकारने निर्णय घेतला, परंतु नेमक्या अटी जाहीर केल्या नाही. सध्या जी माहिती पुढे आली त्यापेक्षा वेगळीही असू शकते. हा विषय शेती व शेतकऱ्यांशीही संबंधित आहे. - अटींची प्रतीक्षा करावी हवी, असे मत दुर्गापुरातील कमलेश नावाच्या दुकानदाराने व्यक्त केले. सध्या तरी काही सांगता येणार नाही, असे म्हटले.
गैरवापरही होऊ शकतो वाइन विक्रीचा परवाना मिळालेल्या किराणा दुकानातून दारू विक्रीची शक्यताही आहे. यातून अवैध व्यवसाय फोफावतील किराणा दुकानदार बदनाम होतील, अशी भिती काहींनी व्यक्त केली.
किराणा दुकानदार म्हणतात...
किराणा दुकानात मी अंडी विकतो. शुद्ध शाकाहारी अनेक ग्राहक दुकानात येतात, परंतु ते अंडीच घेतात, असे नाही. ग्राहकांना जे आवश्यक आहे, त्या वस्तू विकत घेतील. - शंकर लेनगुरे, किराणा दुकानदार.
एक हजार चौरस फुटांच्या जागेतील किराणा दुकानात वाइन विक्री होईल. माझे किराणा दुकान लहान आहे, अटीत बसत नाही. सुपर मार्केट शहर व तालुकास्थळी असतात. तिथला ग्राहक श्रीमंत असतो. -विवेक रामपल्लीवार, किराणा दुकानदार.