ऐतिहासिक वास्तू इतिहासात जमा होऊ नये : लोखंडी पूल मोजतोय अखेरची घटका
राजकुमार चुनारकर
चिमूर : १६ ऑगस्ट १९४२ ला चिमुरात झालेल्या क्रांतीने चिमूर देशात तीन दिवस स्वतंत्र होते. त्यामुळे चिमूर हे ऐतिहासिक शहर आहे. १९४२ च्या क्रांतीचे मूकसाक्षीदार असलेले ऐतिहासिक अभ्यंकर मैदान, नागमंदिर, डागबंगला, कोंडवाडा व लोखंडी पूल या वास्तू त्या लढ्यातील मूकसाक्षीदार आहेत, नवीन पिढीला या क्रांतीची माहिती होण्याकरिता या ऐतिहासिक वास्तूंचे संग्रहालय सुरू करण्यासाठी शासनासह स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. येथील अनेक वास्तू या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. चिमुरातील हा ऐतिहासिक इमारतींचा ठेवा भविष्यात केवळ पत्ता सांगण्यापुरता मर्यादित राहणार काय, अशी भीती स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे परिवार व्यक्त करीत आहेत.
चिमूर शहरात १६ ऑगस्टला शहीद स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो. देशभरातील नेते उपस्थित राहून शहिदांना मानवंदना देतात. १९४२ च्या क्रांतीची नोंद भारतीय इतिहासात केली आहे. मात्र, या घटनेच्या मूकसाक्षीदार असलेल्या डाकबंगला, लोखंडी पूल ,कोंडवाडा, अभ्यंकर मैदान यासह अनेक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थी व पर्यटकांना शहरातील ऐतिहासिक वास्तुंची माहिती मिळावी, अभ्यास करता यावा, याकरिता संग्रहालय उभारण्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हा वारसा नष्ट होत आहे. त्यामुळे चिमूर क्रांती अवशेषमध्येच उरणार काय, अशी भीती आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
बॉक्स
संग्रहालय उभारण्याची गरज
इतिहासातील अनेक वास्तू व वास्तूंचे शासनाकडून जतन केले जाते. मात्र, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर शहराने दिलेल्या योगदानाची अजूनही ठळकपणे नोंद करण्यात आली नाही. ब्रिटिश अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्याचा धाडसीपणा तालुक्यातील क्रांतिकारकांनी दाखविला होता. हा सारा इतिहास अजूनही नव्या पिढीसमोर व्यापकरित्या आला नाही. आता तर रस्ते व इमारती बांधण्याच्या हव्यासापोटी हा वारसा नष्ट करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. हा इतिहास हजारो वर्षे प्रेरणा देत राहावा, यासाठी सरकारने वस्तुसंग्रहालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे.
बॉक्स
असा आहे इतिहास
१६ ऑगस्ट १९४२ ला अभ्यंकर मैदानावर शेकडो क्रांतिकारक गोळा झाले. तिथून प्रभातफेरी काढण्यात आली. बालाजी मंदिर मार्गे व तो दिवस नागपंचमीचा असल्याने नागमंदिर येथे क्रांतिकारक पोहचले. याच दरम्यान इंग्रजांनी डिवचल्याने क्रांतिकारकांनी डागबंगला येथे लपून असलेले इंग्रज अधिकारी सोनवणे, डुंगाजी यांचा या बंगल्यात वध केला तर लोखंडी पुलावर जरासंधचा वध केला. त्यामुळे या क्रांतीतील हे मूकसाक्षीदार आहेत.
बॉक्स
इंग्रजांनी नागरिकांना कोंडवाड्यात कोंडले
१५ बाय २० फूट जागेत असलेल्या जनावरांच्या कोंडवाड्यात तब्बल २५० क्रांतिकारकांना जनावरांसारखे डांबण्यात आले. त्या कोंडवाड्यामध्ये दुर्गंधीशिवाय काहीही नव्हते. त्यामुळे हा कोंडवाडाही साक्षीदार असून तोही मोडकळीस आला आहे.
140821\img20210814104039.jpg
चिमुर क्रांतीतील मूक साक्षीदार