लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण देशातील विषमता नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषमता मुक्तीच्या संकल्पात सहभागी होण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करू या, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासामध्ये निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.येथील दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात बोलत होते. यावेळी ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूरची भूमी ही क्रांतीची भूमी आहे. चिमूर, आष्टीचा क्रांती लढा प्रसिद्ध आहे. चीनच्या आक्रमणानंतर सर्वात जास्त सुवर्णदान देण्याचा पराक्रमही चंद्रपूरचा आहे. भारतामध्ये नागपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची दीक्षाभूमीदेखील चंद्रपूर येथेच आहे. त्यामुळे या भूमीची महती कमी होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याची आपली जबाबदारी आहे. नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्याचे महत्त्व देशामध्ये वाढले पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दीक्षाभूमीसाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी दिला व यानंतरही दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दीक्षाभूमी विकासाच्या संदर्भात आमदार नाना श्यामकुळे यांनी सर्व संबंधितांना घेऊन योग्य प्रस्ताव द्यावेत. शासनाकडून अपेक्षित प्रस्ताव मान्य करून आणण्याची जबाबदारी आपली राहील, असेही त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायापुढे स्पष्ट केले.यावेळी आमदार नाना श्यामकुळे यांनी बाबासाहेबांच्या प्रचंड संघर्षानंतरही समाजामध्ये अद्यापही आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात असून आर्थिक विषमता दूर करण्याचा त्यांचा लढा पुढे करण्यासाठी अनुयायांनी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर यांनीही संबोधित केले. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, सीईओ जितेंद्र पापळकर, जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे आदी उपस्थित होते.शिस्त आणि श्रद्धेचा समुदाय - अहीरचंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर जमलेला जनसमुदाय हा शिस्त आणि श्रद्धेचा समुदाय असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुत्वाचा पुरस्कार केला. त्यांचा संघर्ष निशस्त्र होता. त्यामुळे हातामध्ये शस्त्र घेणारे बाबासाहेबांचे अनुयायी असू शकत नाही, असे स्पष्ट केले. दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भातील सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र शासनाकडून दीक्षाभूमीच्या विकासाचे काही प्रस्ताव लवकरच पूर्ण होतील, असे त्यांनी सूतोवाच केले.नोकरभरतीसाठी महामेळावायावेळी त्यांनी बल्लारपूर येथे होत असलेल्या युथ एम्पॉवरमेंट समीटचाही उल्लेख केला. राज्य शासन ७२ हजार नोकर भरती करणार आहे. या नोकरभरतीमध्ये चंद्रपूरचा टक्का अधिक असावा यासाठी युवाशक्तीने चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या मिशन सेवा, मिशन कौशल्य विकास, मिशन समाजकार्य, मिशन फॉरेन सर्विस, मिशन कृषी आदी घटकातील रोजगार महामेळाव्यात २८ व २९ आॅक्टोबरला सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दीक्षाभूमीची महती कायम ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:03 PM
संपूर्ण देशातील विषमता नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषमता मुक्तीच्या संकल्पात सहभागी होण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करू या, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बाबासाहेबांच्या विषमतामुक्ती संकल्पात सहभागी व्हा