लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने इथेनॉल बनवण्यासाठी मक्याचा वापर केला जाणार असल्याचे धोरण जाहीर केले आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात इथेनॉलची आवश्यकता आहे. यातूनच राज्यात मका लागवडीचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम चंद्रपूर जिल्ह्यातही झाला आहे. जिल्ह्यात मका लागवडीचे क्षेत्र पूर्वी निरंक होते. हे क्षेत्र आता दोन हजार हेक्टरवर पोहोचले आहे. अलीकडच्या काळात या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने इंधनांमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धान्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. यात मक्याला प्राधान्य दिले आहे. गतवर्षी मक्यापासून निर्मित इथेनॉलच्या किमतीतही वाढ केली होती. तसेच बाजारात मक्याला उठाव वाढला आणि दरदेखील वाढला.
इथेनॉल निर्मितीसाठी मागणी वाढलीधान्यापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या उद्योगांमध्ये मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी तसेच मका उत्पादनात वाढीसाठी मक्यापासूनच्या इथेनॉलला तुलनेने जादा दर आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची मागणी आहे.
मका लागवडीसाठी अडचण काय?मक्याची लागवड पावसावर अवलंबून असते. मक्याचे उत्पादन वारंवार होणाऱ्या दुष्काळामुळे, तर कधी अतिपावसामुळे अनेकदा धोक्यात आले आहे. संतुलित तापमान मिळाले नाही तर उत्पादनात घटीची शक्यता असते.
पशुखाद्य म्हणूनही वापरपोल्ट्रीतील कॅटलफीड, पशुखाद्य अन्नप्रक्रिया तसेच स्टार्च उद्योगासाठी मक्याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्ह्यात मका पिकाच्या लागवडीचे क्षेत्र किती ?दरवर्षी मका लागवड अत्यल्प राहत होती. मात्र यंदा दोन हजार हेक्टरच्या जवळपास लागवडीचे क्षेत्र आहे.
इतर कोणत्या पिकांवर परिणाम झाला?खरीप आणि रब्बी हंगामात मक्याचे पीक घेता येत असल्याने तसेच बाजारात निश्चित दर मिळत असल्याने शेतकरी मका लागवडीकडे वळत आहेत.त्यामुळे दरवर्षी घेतली जाणारी इतर पिके कमी प्रमाणात घेण्याचा विचार शेतकरी करीत आहेत.
१२५ दिवस कालावधीत होते पीक पूर्णकालावधीचे हे पीक शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासह खात्रीचे पीक मानले जाते.
"मका पिकासाठी मोठी वाव आहे. मक्याचे एका एकरात जवळपास ४० क्विंटल उत्पन्न होते. मक्यापासून चाऱ्यांची निर्मिती होते. त्यामुळे हे पीक परवडणारे आहे. यंदा मक्याचा पेरा वाढला आहे. जवळपास दोन हेक्टरवर रबी हंगामात मक्याचा पेरा होता."- शंकरराव तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक, चंद्रपूर