चंद्रपूर : लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि वार्षिक प्रशासन अहवाल हा स्वराज्य संस्थांचा कारभार कसा चालतो, याचा आरसा असतो. शासनाकडून मिळालेला निधी व प्रत्यक्ष योजनांवर झालेला खर्च नियमानुसार आहे की नाही, याचे प्रतिबिंब या दोन अहवालात उमटते. त्यामुळे मंगळवार (दि. ९) पासून जिल्ह्यात तीन दिवस मुक्कामी असणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायत राज समितीने या दोन अहवालांबाबत प्रश्नांची सरबत्ती करणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे, अहवाल वर्षातील संबंधित तत्कालीन सर्व अधिकाऱ्यांचीही साक्ष नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे या उलटतपासणीने काही अधिकारी धास्तावल्याची चर्चा आहे.
मंगळवारी जिल्ह्यात आगमन होणाऱ्या पंचायत राज समितीचे प्रमुख आ. संजय रायमुलकर हे आहेत. या समितीत २९ सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय, समितीसोबत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव, अवर सचिव, दोन कक्ष अधिकारी, समिती प्रमुखांचे स्वीय सहायक, चार कर्मचारी, चार प्रतिवेदक, अशा एकूण १३ व्यक्तींचा सहभाग राहणार आहे. ९ ते ११ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही समिती जिल्हास्थळी मुक्कामी असेल. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सहा आमदारांशी ही समिती अनौपचारिक चर्चा करणार असल्याचे समजते. सकाळी ११ वाजता दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी विश्रामगृहात चर्चा करणार आहे. त्यानंतर समितीचे आगमन जि. प. सभागृहात होणार आहे. चंद्रपूर जि.प.च्या सन २०१०-२०११ ते सन २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील संबंधित परिच्छेदांबाबत मुख्य कार्यकाऱ्यांची साक्ष नोंदविणार आहेत. बुधवारी पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून साक्ष नोंदविणार आहे. शेवटच्या दिवशी सन २०११-२०१२ ते सन २०१७- १८ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालाबाबतही साक्ष नोंदवून घेणार आहे.
२०१० ते २०१८ या वर्षावर जास्त फोकस
चंद्रपूर जि.प.च्या सन २०१०-२०११ ते सन २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन २०११-२०१२ ते सन २०१७- १८ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालावर या समितीचा जास्त फोकस असल्याची अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. या वर्षाशी संबंधित चंद्रपूर जिल्हा परिषदेत कार्यरत तत्कालीन संबंधित सर्व अधिकाऱ्यांनाही बैठकीत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.