राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यात नंबरविना धावणारी वाहने पकडण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई योग्य असली तरी मग ओव्हरलोड ट्रकधारकांवर का कारवाई केली जात नाही? गेल्या काही दिवसांपासून ओव्हवलोड वाहतूक सर्रास सुरू असून यामुळे अपघात वाढले आहेत. मात्र या वाहनांवर कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाबाबत तीव्र असंतोष पसरला आहे.जिल्ह्यातील १५ तालुक्यात ओव्हरलोड वाहने, अवैध भंगार विक्रेते, हजारो दारु विक्रेते खुलेआम नियमाचे उल्लंघन करीत आहेत. यावर तोडगा कधी काढणार? एखाद्या मुलाने वाहन खरेदी केले तर त्याला ताबडतोब नंबर दिली पाहिजे. मात्र दोन- तीन महिने नंबरच मिळत नाही, याला जबाबदार कोण, गाडी घेणारे की, नंबर देणारे? जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात प्रवाशांना बसवून जीवघेणा प्रवास करतात. हे सर्व पोलिसांच्या डोळ्यादेखत घडते. मात्र कारवाई होत नाही. अनेक वाहनधारकांजवळ कागदपत्रे नाही, फक्त मोहिम उघडून चालणार नाही तर ही मोहिम वर्षभर ठेवणे गरजेचे आहे. तरच यावर आळा बसेल नाही तर अवैध कामे राजरोसपणे चालुच राहणार एवढे मात्र निश्चित.चंद्रपूर शहरात शहराबाहेरुन राजुरा, बल्लारपूरवरुन येणारी वाहने पकडली जात आहेत. चंद्रपूर शहरात तर नंबरविना अनेक वाहने धावत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. हेलमेट तर कुणीच घालताना दिसत नाही. पोलीसच हेलमेटचा वापर करीत नाही तर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करावयाच्या. चंद्रपूर शहरात केवळ महाविद्यालयीन मुलाना वेठीस धरण्याऐवजी मुलांची बाजु सुद्धा ऐकूण घेणे गरजेचे आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी. (शहर प्रतिनिधी)
ओव्हरलोड वाहनांवर कारवाई होणार काय?
By admin | Published: September 25, 2015 1:35 AM