चंद्रपूर : वाघ हा अभिमानाचा विषय असून वाघाची गती व शक्ती हे पराक्रमाचे प्रतीक मानले जाते. ताडोबात वाघांची संख्या वाढल्याने त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी उसळते. त्यामुळे वन विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सौजन्यपूर्ण आचरणातून ताडोबातील पर्यटकांची मने जिंकावी, अशी अपेक्षा राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोहर्ली येथे निसर्ग पर्यटन गेटच्या सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केली.
मंचावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रवीण चव्हाण, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, राजस्थान वन्यजीव बोर्डाचे सदस्य सुनील मेहता, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मोहर्लीच्या सरपंच सुनीता कातकर, हरीश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, संध्या गुरुनुले, छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू उपस्थित होते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली येथे ७.४२ कोटींच्या पर्यटन गेटच्या कामाचे भूमिपूजन झाले. वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वनविभाग हा केवळ एक शासकीय विभाग नसून तो एक परिवार आहे. ताडोबाचे नाव जगात अधिक चांगले होण्यासाठी सर्वांनी मनापासून काम करावे, अशी सूचना केली.
चंद्रपुरात वाघांची संख्या लक्षणीय वाढल्याने स्थलांतर करण्यात येत आहे. ताडोबातील दोन वाघिणींना नागझिरा अभयारण्यात पाठविण्यात आले. आणखी आठ वाघ सह्याद्रीत सोडण्यासाठी भारत सरकाची परवानगी मागितल्याचे त्यांनी सांगितले. मराठी व्याघ्र गीताचे अनावरण व चित्रफित लोकार्पण झाले. प्रास्ताविक क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर तर संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी आभार मानले.
मोहर्लीत पर्यटन सेवा केंद्र
ताडोबा क्षेत्रातील मोहर्लीत आकर्षक प्रवेशद्वार, पायाभूत सुविधांसोबतच आर्किटेक्टद्वारे भिंती रंगविणे, आकर्षक मूर्ती लावणे, वातानुकूलित प्रतीक्षालय, उपहार गृह, व्याघ्र प्रकल्पाची सचित्र माहिती देणारे केंद्र, प्रसाधन गृहे, भेटवस्तू विक्री केंद्र, पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. मोहर्लीत सेव्हन डायमेंशन थिएटरही होणार आहे.
ताडोबावर लघुचित्रपट
छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू यांनी माया वाघीण व तिच्या बछड्यांवर आधारीत शॉर्टफिल्म तयार केली. आता त्यांनी ताडोबावर आधारित आकर्षक फिल्म तयार करावी. ही फिल्म मुंबईच्या चित्रपटनगरीत दाखविण्यात येईल. वाघांची माहिती केंद्रासोबत मोहर्लीत सात डायमेंशनयुक्त थिएटर तयार करावे, अशी सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी केली.