बल्लारपूर: चंद्रपूर येथे ओबीसींचा विशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आला. सदर मोर्चामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा सहभाग नोंदविला. दरम्यान, मोर्चा आयोजकांनी करोना नियमाचे उल्लंघन केले म्हणून रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आयोजन समितीच्या सदस्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्हा अन्यायकारक असुन आयोजकांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
करोनाच्या काळात अनेक विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी अनेक कार्यक्रम घेतले. नियमाचे सर्रास उल्लंघन केले असताना सुद्धा त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले नाही. परंतु ओबीसी समन्वय समितीने करोना संदर्भातील सर्वच नियमांचे पालन केले असताना त्यांच्या वर हेतुपरस्सर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर सर्व गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणीचे निवेदन येथील ओबीसी समन्वयक समितीने नायब तहसिलदारांना दिले. यावेळी अनिल वाग्दरकर, पी.यु.जरीले, प्रा.एम.यु.बोंडे, मनोहर माडेकर, एम.जे.झाडे, प्रा.राजेंद्र खाडे, चंद्रकांत वाढई उपस्थित होते.