चंद्रजित गव्हारे लोकमत न्यूज नेटवर्क आक्सापूर : तेलंगणा सीमेवरील गोंडपिंपरी तालुका उद्योगविरहित आहे. या तालुक्याला लागून बारमाही नद्या वाहतात. असे असताना देखील येथे रोजगार मिळवून देण्यासाठी म्हणून उद्योग आणण्यात शासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. यामुळे उद्योगाविना गोंडपिंपरी तालुक्यात दिवसेंदिवस बेरोजगारांची फौज वाढत आहे.
तेलंगणा सीमेवरील गोंडपिंपरी तालुका उद्योगविरहित आहे. या तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीच्या भरवशावर येथील नागरिक आपली उपजीविका करतात. तालुक्यात कोणताच उद्योग नसल्यामुळे रोजगाराविना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी येथे औद्योगिक विकास महामंडळाची सुमारे ३५ एकर जागा १९८० च्या दशकात शासनाने औद्योगिक प्रयोजनार्थ अधिग्रहित केली. मात्र अद्यापही येथे एकही उद्योग उभा राहिला नाही. एकंदरीत तालुक्यात उद्योग आणण्यात शासनाला अपयश आले. गोंडपिंपरी तालुक्याला लागून वर्धा, वैनगंगा आणि अंधारीसारख्या बारमाही नद्या वाहतात. या तालुक्याला नेहमीच पोरकेपणाची वागणूक दिल्याची चर्चा अधूनमधून डोके काढत असते. उद्योगविरहित गोंडपिंपरी तालुक्याची भिस्त शेतीवर आहे. शेती, शेतमजुरी आणि रोजंदारीच्या कामावर येथील नागरिक आपली गुजराण करतात. शेतीचा हंगाम आटोपला की तालुक्यातील बहुतांश मंडळी रोजगारासाठी परप्रांतात धाव घेतात. गोंडपिंपरी तालुक्यात एक ना अनेक समस्या आजही आवासून उभ्या आहेत. बेरोजगारीसह तालुक्यात सिंचनाचे प्रश्न अजूनही कायम आहेत. विधानसभेच्या निवडणुका आल्या की करंजी एमआयडीसीचा मुद्दा उपस्थित केला जातो, एकदाची निवडणूक गेली की या मुद्याला बगल दिली जाते.