चंद्रपूर : एक महिला अधिकारी रोखपालाच्या दालनात जातात. माझ्या पगाराचा धनादेश का अडविल्याचे म्हणत चक्क रोखपालाचा मोबाईल व लॅपटाॅप फेकाफेक सुरू करते. इतकेच नव्हेतर टेबलावरील फाईलींची फेकाफेक सुरू होते. ॲक्शन पटातील दृश्याप्रमाणे दिसत असलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
या व्हिडीओतील घटनाक्रम हा चंद्रपूर जिल्ह्यातील मागास असलेल्या जिवती नगर पंचायतील आहे. मारहाण करताना दिसणाऱ्या तेथील मुख्याधिकारी कविता गायकवाड आहेत, ही बाब या मारहाणीची लेखी तक्रार रोखपाल सागर कुऱ्हाडे यांनी लगेच जिवती पोलीस ठाण्यात केल्यानंतर पुढे आली आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. हा प्रकार १० जानेवारीला दुपारी १२ वाजता घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, मुख्याधिकारी अचानक आपल्या दालनात येऊन मोठ्याने अर्वाच्च भाषेत बोलू लागल्या. त्यांनी मागितलेली थकबाकीची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास आस्थापना विभागाने सांगितले होते. तसेच त्यांच्या काही नियमबाह्य देयकांची अंशत: वसुली करून उर्वरित देयक सादर करण्यास सांगितले होते. याचा त्यांनी वचपा काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्या इतक्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी कॅल्क्युलेटर, इतर साहित्य अंगावर भिरकावण्यास सुरुवात केली. नियमबाह्य काम करण्यास नकार दिल्याने माझाच वैयक्तिक मोबाईल व लॅपटाॅप उचलून माझ्या दिशेने फेकून मारला. लॅपटाॅप भिंतीवर आपटून फुटला. यामध्ये ६० हजारांचे नुकसान झाले आहे. हा नियोजनपूर्व शारीरिक इजा पोहोचविण्यासाठी हल्ला केल्याचा आरोप तक्रारीतून सागर कुऱ्हाडे केला आहे.
दोन दिवसांनी महसूल विभागात जाणार
मुख्याधिकारी कविता गायकवाड या येत्या दोन दिवसांत नगर विभागातून महसूल विभागात कर्तव्यावर जाणार आहे. अशातच त्यांचा हा रुद्रावतार असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे.