चंद्रपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना राजुरा-रामपूर-कवठाळा मार्गावरील वरोडा गावाजवळ उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अल्का गोखरे असे अपघातातमृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या नातेवाईकाबरोबर दुचाकीने आपल्या मावसबहिणीकडे जात होत्या. वरोडा गावाजवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडून असल्याने दुचाकी काढताना अल्का गोखरे या मागे उसळून पडल्या. याचवेळी मागून एक ट्रक येत होत्या. त्या मागे उसळून ट्रकखाली आल्या.
दरम्यान, राजुरा-रामपूर-कवठाळा या मार्गावर गेल्या दोन वर्षापासून काम सुरू आहे. मात्र, सहा महिन्यांपासून हे काम बंद असल्याने मागील सहा महिन्यांपासून रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिमाणी या मार्गावरुन येता-जाताना मार्गस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो व अनेकदा अपघातही घडले आहेत. मात्र, प्रशासनाचे याकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
आज पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्ड्यांनी महिलेचा बळी घेतला. या घटनेनंतर नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या क्षेत्राच्या लोकप्रतिनिधीचेही बांधकामाकडे लक्ष नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून बांधकाम त्वरित सुरू न केल्यास रस्त्यावर उतरुन रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.