नागभीड (चंद्रपूर) : शेतात पडलेल्या धानाची वेचणी करणाऱ्या महिलेवर दोन वाघांनी हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना नागभीड तालुक्यातील टेकरी येथे गुरुवारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याच पंधरवड्यात पान्होळी येथे वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाला होता. लागोपाठ घडलेल्या या घटनांनी परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
मृतक महिलेचे नाव जाईबाई तुकाराम तोंडरे (६०) रा. तोरगाव असे आहे. जाईबाई आपल्याच शेतात पडलेल्या धानाची वेचणी करीत होती. धान वेचत असताना अचानक दोन वाघ आले आणि तिच्यावर हल्ला केला व मृतदेहजवळच असलेल्या नाल्यात ओढत नेला. वाघांनी हल्ला केला तेव्हा जाईबाईने वाघांच्या तावडीतून सुटून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र समोर असलेल्या बांधावर ती पडली. आणि याचवेळी वाघांनी डाव साधला. यावेळी धावा धावा म्हणून तिने आवाज दिला. या आवाजाने बाजूच्या शेतातील काही व्यक्ती तिच्या शेताकडे धावले. तोपर्यंत वाघांनी तिला जवळच असलेल्या नाल्यात फरफटत नेले होते.
शेतशिवारात गुरे चारणाऱ्या शेतकऱ्याला वाघाने केले ठार; एकाच गावातील तिसरा बळी
मदतीसाठी धावलेले व्यक्ती नाला ओलांडून महिलेच्या शेताकडे जात असताना वाघ जाईबाईच्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे दिसून आले. दरम्यान वनविभागाला ही माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. मृतक महिलेस पती, १ मुलगा आणि दोन मुली आहेत.
फटाके फोडून वाघांना पिटाळले
महिलेवर हल्ला केल्यानंतर वाघ जागा सोडत नव्हते. म्हणून नागरिकांनी फटाके फोडून वाघांना पिटाळून लावले.