सावली (चंद्रपूर) : कापूस काढणीकरिता गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खेडी येथे घडली. स्वरुपा प्रशांत येल्लेटीवार (४५, रा. खेडी) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, बुधवारी याच तालुक्यात एकाचा वाघाने बळी घेतला होता. याचवेळी लगतच्याच मूल तालुक्यात एका गुराख्यालाही ठार केले होते.
तालुका परिसरातील गावे जंगलालगत असल्याने हिंस्त्र पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यातील खेडी येथील स्वरूपा आणि सोबतच्या तीन महिला कापूस काढणीच्या कामाकरिता गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात गेल्या होत्या. यावेळी काम करत असताना त्यांच्या पाठीमागे दबा धरून बसलेल्या वाघाने स्वरूपा हिच्यावर हल्ला करून ठार केले. अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्याने सोबतच्या महिला भयभीत होऊन आरडाओरडा करू लागल्या. त्यामुळे वाघाने मृतदेह टाकून पलायन केले.
वाघाच्या भीतीने लोकं दहशतीत, आणखी दोघांचा घेतला बळी
घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. सावली येथील वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, संतप्त गावकऱ्यांनी हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याची मागणी करत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वन विभागाने सावली पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर तातडीने हजर झाले होते. मृतकाच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये व पाच लाखांचा धनादेश देण्यात आल्यानंतरच तणाव शांत झाला. यावेळी सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर, ठाणेदार आशिष बोरकर व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
११ दिवसांत दहा तर वर्षभरात ४९ बळी
चंद्रपूर जिल्ह्यासाठी वाघ सध्या कर्दनकाळ बनला आहे. वाघाने मागील ११ दिवसांत दहा जणांना ठार केले आहे. ३ डिसेंबरला एकाला वाघाने ठार केल्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत तब्बल दहा जणांना वाघाने मारले आहे. विशेष म्हणजे, या वर्षभरात वाघाने जिल्ह्यातील ४९ जणांना ठार केले आहे.
नरभक्षक वाघांना जेरबंद करा - सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात सातत्याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून, या नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करावे, अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.