चंद्रपूर : इंपोर्टेड गिफ्टच्या नावावर राजुरा येथील एका महिलेला तब्बल ११ लाखांनी गंडविल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. आरोपीने व्हॅट्सअॅप कॉल करून ही फसवणूक केली आहे. आरोपीचे तार थेट दिल्लीशी जुळलेले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. महिलेच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२० कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन लुटपाटच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजुरा शहरातही एका महिलेला ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवून नंतर हळुहळू तिचा वाट्सअॅपवर नंबर घेतला. यानंतर, काही दिवसांनी तिला विदेशातून इंपोर्टेड गिफ्ट पाठवले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, हे गिफ्ट पैशाच्या कमतरतेमुळे दिल्लीत अडकून पडल्याचे तिला सांगण्यात आले. सोबतच हे गिफ्ट अतिशय मौल्यवान असल्याचेही सांगण्यात आले. ती आता नागपूरला आली आहे, अशी बतावणी करून चक्क ११ लाख रुपयांचा गंडा घातला. यापूर्वी राजुरा शहरातील एका डॉक्टरला एक कोटीचे कर्ज काढून देतो म्हणून २० लाखांनी गंडविले होते. या दोन्ही प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहचले आहेत.
या प्रकरणी राजुरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी एस. वी. दरेकर म्हणाले, या प्रकरणाचे तार दिल्लीशी जुळले आहे. दिल्ली येथील अनेक एटीएममधून पैसे काढुन फसवणूक केली आहे. तो इतका गुन्ह्यात इतका तरबेज आहे की त्याने मोबाईलवरून कुठेही फोन केला नाही. फक्त व्हॅट्सअँपवरून कॉल करत होता. त्यामुळे आवश्यक डाटा उपलब्ध झाला नाही. राजुरा शहरात फसवणुकीचे जाळे पसरले आहेत. राजुरा पोलिस याबाबत कसून चौकशी करीत आहेत.