दोन मुले जखमी : घटनास्थळावर तीन तास तणावघुग्घुस : आपल्या दोन मुलाला शाळेत सोडण्याकरिता पायदळ जात असताना मागून येणाऱ्या हायवा ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही मुले जखमी झाले. सदर घटना आज शनिवारला सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान स्थानिक चंद्रपूर रस्त्यावरील वियाणी विद्या मंदिर परिसरात घडली. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जोपर्यंत आर्थिक मदत देण्यात येत नाही. तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही. असा पवित्रा नागरिकांनी उचलल्यामुळे घटनास्थळावर तणाव निर्माण झाला. त्यामुळे घुग्घुस पोलिसांनी दंगा नियंत्रणाला पाचारण केले. तीन तासांच्या चर्चेनंतर प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. अपघातानंतर हायवा चालक निशाद सदारी यांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात आत्मसंर्मपण केले.सुषमा संजय घाटे वय २६ असे मृत महिलेचे नाव आहे. तर खुशाल घाटे (६), श्रवण घाटे (४) असे जखमी मुलांचे नाव आहेत. खुशाल हा दुसरीतील तर श्रवण हा नर्सरीचा विद्याथी आहे. दोघांवरही चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. नेहमीप्रमाणे सदर महिला दोन्ही मुलाला वियाणी विद्या मंदिरला पोहोचण्यासाठी निघाली असता, मागुन येणाऱ्या हायवा ट्रक क्र. एमएच ३४ एबी २३९९ ने महिलेला चिरडले. महिला ट्रॅक हायवाच्या मागच्या चाकात आल्याने जागेवर मृत्यूमुखी झाली. सुदैवाने शाळेकरी विद्यार्थी बचावले असले तरी एकाच्या पायाला तर दुसऱ्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र जोपर्यंत महिलेला आर्थिक मदत मिळणार नाही. तोपर्यंत महिलेचा मृतदेह उचलणार नाही, असा प्रवित्रा नागरिकांनी घेतल्यामुळे घटनास्थळावर तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये एसडीपीओ सुशील नायक, पोलीस निरीक्षक पगारे व मृतक महिलेचे पती, नातेवाईक व भाजपचे येथील अध्यक्ष विनोद चौधरी, नवनिर्वाचित पं.स. सदस्य निरीक्षण तांड्रा, सामाजिक कार्यकर्ते राजुरेड्डी, पं.स. सदस्य रोषण पचारे, इंटकचे लक्ष्मण सादलावार यांची संयुक्त बैठक चर्चा झाली. त्यानंतर मृतक परिवाराला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत, विम्याची रक्कम, जखमी दोन्ही मुलांच्या दवाखान्याचा खर्च देण्याचे ट्रान्सपोर्ट मालकाने देण्याचे मान्य केले. या तीन तासाच्या चर्चेनंतर मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता पाठविण्यात आले.सदर मार्गावर विद्या मंदिर इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमाचे प्रियदर्शनी कन्या विद्यालय आले. शाळा भरण्याचे वेळी व शाळा सुटण्याच्या वेळी वाहतूक शिपाई देण्यात यावी, अशी मागणी शाळेकडून वेळोवेळी करण्यात आली. मात्र वाहतूक शिपाई राहत नसल्याने अपघात घडतात.
मुलाला शाळेत पोहोचवायला जाणाऱ्या महिलेला ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2017 12:44 AM