फोटो - मोबाइल परत देताना पोलीस.
ब्रह्मपुरी : समाजात काही घटना अशा घडतात की ज्यामुळे पोलीस आणि समाज यांच्यातील नाते आणखी घट्ट होऊन जाते. अशीच एक घटना ब्रह्मपुरी शहरात घडली. एक महिला रडत रडत ब्रह्मपुरीच्या पोलीस ठाण्यात आली. त्या वेळी ठाण्यात उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या महिलेची आस्थेने विचारपूस केली. महिलेचा मोबाइल चोरीला गेला हे समजताच घटनेच्या ठिकाणी पोलीस तत्काळ पोहोचले. तेथील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. पोलीस लगेच कामाला लागले आणि अवघ्या काही वेळातच मोबाइल चोराचा शोध लावला.
त्याच्याकडून मोबाइल हस्तगत केला आणि विधवा महिलेच्या स्वाधीन करून तिला पोलिसांनी आपल्या वाहनाने स्वगावी सोडून दिले. त्याचबरोबर महिलेला आर्थिक मदतसुद्धा दिली. ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव येथील रहिवासी असलेली किरण गायकवाड (२४) ही विधवा महिला बँकेच्या कामासाठी पारडगाव येथून ब्रह्मपुरीमध्ये आली. त्या महिलेला पैशाची गरज असल्याने ती एटीएममध्ये गेली. पण, बाहेर पडल्यावर काही वेळाने तिच्या लक्षात आले की तिचा मोबाइल बँकेच्या एटीएम रूममध्ये विसरला. लगेच ती महिला एटीएममध्ये गेली. परंतु मोबाइल तिथून गायब झाला होता. मोबाइल चोरीला गेल्याचे कळताच त्या महिलेने लागलीच पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी उपस्थित पोलिसांना आपबिती सांगितली. विधवा महिलेची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुरेंद्र उपरे व पोलीस कॉन्स्टेबल सचिन बारसागडे या दोन पोलिसांनी तत्काळ सदर महिलेला वाहनात बसवून बँकेच्या एटीएममध्ये आणले. तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यामध्ये एक मुलगा महिलेचा मोबाइल चोरताना स्पष्टपणे दिसून आले. पोलिसांनी त्वरित त्या मुलाच्या घराचा पत्ता शोधून काढला आणि चोरलेला मोबाइल ताब्यात घेतला. सदर मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला समज दिली. महिलेचा चोरी गेलेला मोबाइल तिच्या स्वाधीन केला. एवढेच नाहीतर, आपल्या वाहनाने तिच्या स्वगावी सोडून देत आर्थिक मदतसुद्धा दिली. ज्या तत्परतेने या दोन पोलिसांनी हे कार्य केले, त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.