बचत गटांना नवसंजीवनी
विकास खोब्रागडे
पळसगांव (पिपर्डा) : चूल आणि मूल या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन पळसगाव येथील हाताला काम नसलेल्या महिलांचे बचतगट तयार करण्यात आले होते. दुर्गामाता शेती महिला बचत गटाची सन २००१ मध्ये स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपली आर्थिक प्रगती साधण्यात चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील दुर्गा शेती महिला बचत गटातील महिला यशस्वी झाल्या आहेत.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन आपला किसान समृद्धी सेंद्रिय खत विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून आपला विकास करणे सुरू केले आहे. बचत गटाच्या महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मासळ या शाखेतून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आल्यामुळे बचत गटातील महिलांनी आपला रोजगार स्थापन करून आर्थिक उन्नतीचा मार्ग निवडला असल्याची माहिती बचत गटातील अध्यक्षा भामिना सोनेकर व वंदना गुळधे यांनी दिली.
बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे. कर्जाच्या स्वरूपात घेतलेल्या रकमेतून मागील वर्षी पळसगाव व चिमूर येथील प्रसिद्ध घोडा यात्रेवर झुणका भाकर केंद्राचा व्यवसाय या महिलांनी केला होता. यावर्षी सेंद्रिय खत विक्रीचा व्यवसाय करण्याचे या महिलांनी ठरविले. आता बसस्थानकाजवळ सेंद्रिय खत विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.
बॉक्स
पुढील महिन्यात आणखी दुसरा उद्योग
ग्रामीण भागातील महिलांनी आता स्वयंरोजगार बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधण्याचा ध्यास धरला आहे. बचतगट गुणवत्तापूर्ण कार्य करीत असल्यामुळे त्यांना बँकेकडून सहज कर्ज दिले जाते. बचत गटामध्ये १५ महिलांचा समावेश असून सद्यस्थितीत महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम झाल्या असल्याचे चित्र दिसत आहेत. लघु उद्योग म्हणून पुढील महिन्यात पत्रावळी बनविणारी मशीन आणून उद्योग सुरू करणार असल्याचे बचत गटाच्या प्रेमिला गावातुरे, प्रतिभा गावतुरे, ललिता सहारे, आशा सहारे, उषा सोनेकर, संगीता दडमल, वैशाली चौधरी, बेबी सोनुले, कल्पना गुरनुले, वैशाली सोनूले,भाग्यश्री गुरनुले, सिंधू सोनावणे, सुशीला चौधरी यांनी सांगितले.
120821\img20210808135907.jpg
बचत गटातील महिला सेंद्रिय खत विक्री करताना