चंद्रपूर : विज्ञानाने प्रगती केली आणि शासनाने मान्यता दिली असली, तरी आजही विधवा महिलांना समाजात रूढी-परंपरांचा त्रास होतो. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभामध्ये त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. पतीच्या निधनानंतर कपाळावर हळद-कुंकूसुद्धा लावता येत नाही. ग्रामीण भागात ही परंपरा आजही कायम आहे. ही प्रथा बंद व्हावी आणि विधवा महिलांनाही सन्मानाने जगता यावे, यासाठी गडचांदूर येथील आधारवेल संस्थेने पुढाकार घेत विधवांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच कपाळावर कुंकू लागताच महिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले. एकमेकींना आलिंगन देऊन त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. गडचांदूर येथील आधारवेल महिला बहुउद्देशीय संस्थेने हा अनोखा कार्यक्रम आयोजित करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
कार्यक्रमाच्या साक्षीदार म्हणून गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, उपाध्यक्ष तथा बांधकाम विभाग सभापती कल्पना निमजे, वंदना धांडे, द्वारका पिंपळकर, संध्या निखाडे उपस्थित होत्या. नलिनी खेकडे, उषा टोंगे, नंदा वांढरे, कल्पना गोवारदिपे, प्रभा वासाडे, वंदना कातकडे, अर्चना देवलवार, अनिता पानपट्टे, सविता चटप, नंदा कोंगरे, अनिता बामनवार, विजया कुचनकार आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
...अन् त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले
पती निधनानंतर बहुतांश विधवा महिलांना एकाकी जीवन जगावे लागते. मात्र, गडचांदूर येथील या महिलांनी एकत्र येत आपल्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. कपाळी हळदी-कुंकवाचा टिळा लागताच महिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले. या कार्यक्रमात पंधरा विधवा महिलांनी एकमेकींना कुंकू लावून जुनी परंपरा मोडीत काढली. यावेळी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी केली.
विधवांनी कपाळाला कुंकू न लावण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे. ती कुणीतरी मोडीत काढली पाहिजे. विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे, त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी आम्ही पुढाकार घेतला. संस्थेच्यावतीने कार्यक्रम आयोजित करून सर्वांनी मिळून एकमेकींना हळद-कुंकू लावून ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.
- वंदना कातकडे, उपाध्यक्ष, आधारवेल संस्था, गडचांदूर.