घुग्घुस : चंद्रपूर मार्गावरील पांढरकवढा येथे अवैध दारू व्यवसाय जोमात सुरु असून याचा नाहक त्रास येथील नागरिकांना होत आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान संतप्त महिलांनी दारू पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली.
दारू व्यवसाय करणाऱ्याच्या दबंग भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले. गाव परिसरातील अवैध दारू विकी बंद करावी, या मागणीचे संतप्त महिलांनी घुग्घुस ठाणेदार राहुल गांगुर्डे यांना निवेदन दिले.
जिल्ह्यात दारूबंदी असताना घुग्घुस नजीकच्या पांढरकवडा गावात अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे. त्यामुळे गावातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. येथील अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जात असून महिला व नागरिकांना त्रास होत असल्यामुळे गावातील संतप्त महिला व ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांनी दारू विक्री करणाऱ्या दारू अड्ड्यावर धाड टाकून ३० हजाराचा दारूचा साठा पकडला व पोलिसांच्या स्वाधीन केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या अर्चना गावंडे, नीला बरडे, बेबीनंदा निखाडे, समीर भिवापूरे, सुरेश तोतडे तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.