लोकमत न्यूज नेटवर्क पोंभूर्णा : तालुक्यातील जामतुकूम व रामपूर दीक्षित येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याने अनेकजण व्यसनांच्या आहारी गेले. कुटुंबात कलह निर्माण झाला. अवैध दारू विक्रेत्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त महिलांनी पोंभूर्णा गुरुवारी (दि. २६) पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
जामतुकूम ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मात्र, काहींनी जामतुकूम व लगतच्या रामपूर दीक्षित गावात अवैध दारू व्यवसाय सुरू केला. आहे. देशी, विदेशी व मोहफुलाची दारू आणून गावात विक्री करीत आहेत. यामुळे गावातील वातावरण कलुषित झाले. महिलांना याचा त्रास होत आहे. अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीला घेऊन जामतुकूम येथील महिलांनी गावात सभा घेतली. त्यानंतर निवेदन देण्यासाठी पोंभूर्णा ठाण्यात धडकल्या. यावेळी माजी पंचायत समिती सभापती रिना बोधलकर, गाव दारूबंदी समितीच्या अध्यक्ष उषा भुरसे, उपाध्यक्ष आशा आलाम, सचिव कोमल कोमलवार, सुजाता मामडपल्लीवार, अंजना भलवे, शीतल गद्देकार, कल्पना नैताम, अरुणा वाडगुरे, प्रेमिला सिडाम, विद्या बुरांडे, ज्योती कतरे, रिना घोंगडे, अर्चना कोमलवार, महिला बचत गटांचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.
निवेदन देताना पोलिस धडकले जामतुकूम येथील महिलांचे निवेदन स्वीकारल्यानंतर ठाणेदार राजकमल वाघमारे यांनी लगेच पोलिस उपनिरीक्षक धनराज सेलोकर व पोलिस कर्मचाऱ्यांसह जामतुकूममध्ये धडकले. अवैध दारू विक्रेत्यांचा घराची झडती घेतली. यावेळी माजी सरपंच भालचंद बोधलकर व नागरिकांशी ठाणेदारांनी चर्चा केली. अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.