कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, परजिल्ह्यातील नागरिक चोरी-छुप्या मार्गाने जिल्ह्यात दाखल होऊ नये, यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा सीमा तसेच चौका-चौकात बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. यामध्ये महिला पोलीस अधिकारी व कर्मचारीसुद्धा सेवा देत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक चेक पॉईंटवर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करणे, ई-पास नसल्यास त्याच्यावर कारवाई करणे, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणे, यासोबतच ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारी, गुन्ह्याचा तपास आदी कर्तव्य बजावावे लागत आहेत. या कालावधीत मूल-बाळ, आई-वडील, घरी असतानासुद्धा पोलीस विभागातील वुमेन वॉरियर्स प्रामाणिक कर्तव्य बजावत आहेत.
बॉक्स
महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया
माझा मुलगा चार वर्षाचा आहे. बऱ्याचदा कर्तव्यावर असताना तो फोन करतो. परंतु, कामाच्या व्यस्ततेत त्याच्याशी व्यवस्थित बोलूही शकत नाही. कोरोनाचा कामाचा ताण वाढला आहे. परंतु, राष्ट्रहिताच्या कामात आपण कर्तव्य बजावत आहोत. याचे समाधान वाटते. याची मुलासह कुटुंबीयांनासुद्धा जाणीव आहे. सुट्टीच्या वेळेस संपूर्ण वेळ कुटुंबीयासह घालवते.
राधिका पवार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रपूर
--------
आई-वडील दोघेही पोलीस खात्यात आहेत. सन, उत्सव असला तरही दोघेही घरी नसतात. कधी घरी येतील, आणि कधी परत जातील याचा काही नेम नाही. परंतु, कोरोनाच्या सावटातही आई आणि वडील दोघेही स्वत:चा जीव धोक्यात घालून राष्ट्रहिताचे काम करीत आहेत. ही आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे.
-धीरज आनंद कुळमेध्ये