साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे विधवा झालेल्या महिलांना आर्थिक ताण पडू नये, त्यांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे. याअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यात २०५ महिलांना लाभ मिळाला आहे. अन्य महिलांचेही प्रस्ताव दाखल झाले असून तालुकास्तरीय समिती यावर निर्णय घेणार आहे. लाभ मिळत असल्यामुळे काही प्रमाणात का होईना, पडत्या काळात दिलासा मिळाला आहे.कोरोनामुळे पतीचे अकाली निधन झाल्यामुळे अशा महिलांवर आभाळ कोसळले आहे. अनेकींच्या वाट्याला हालअपेष्टा आल्या आहेत. विविध समस्यांचा सामना करीत त्या जीवन जगत आहेत. यातील प्रत्येकींचीच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिलांना आधार मिळावा यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मानधन देणे सुरू केले आहे. शासकीय निकषांमध्ये बसत असलेल्या विधवा महिलांना हा लाभ दिला जात आहे. त्यामुळे कठीण काळामध्ये या शासकीय आधारामुळे थोडाफार दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे, २०५ महिलांना आधार मिळाला असला तरी, अन्य महिलांनाही लाभ मिळावा यासाठी कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्याही महिलांना लाभ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
२० हजारांचे अर्थसहाय्य
राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेतून अल्पगटातील विधवा महिलांना एकदाच २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. यासाठी संबंधित महिलांना पतीच्या निधनानंतर तीन वर्षाच्या आत प्रशासनाकडे अर्ज सादर करावा लागतो.
येथे करा अर्ज...अर्जदाराने शासन निर्णयानुसार आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी निर्धारित केलेला अर्ज भरावा. ज्या ठिकाणी राहत असेल, त्या भागातील संबंधित तलाठ्याकडे अर्ज सादर करावा.
विधवा तसेच निराधार असलेल्या महिलांना शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ दिला जातो. महिलांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा. समितीने अर्ज मान्य केल्यानंतर दर महिन्याला संबंधित महिलांना मानधन दिले जाते.- डाॅ. कांचन जगतापतहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर