पोलीस प्रशासनाने बदलविला नंबर : जागतिक महिला अत्याचारविरोधी दिनातील वास्तवचंद्रपूर : देशात दिवसेंदिवस महिला व मुलींवर अत्याचार वाढत आहेत. त्याचे स्वरूपही भयावह होत चालले आहे. महिला व मुलींवर होणारे अत्याचार ही आजची मूळ समस्या बनली आहे. यासंदर्भात शासनाने अत्याचारपीडितांना तातडीने मदत मिळावी म्हणून १०३ या क्रमांकाची हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. जागतिक महिला अत्याचारविरोधी दिनाचे औचित्य साधून मंगळवारी ‘लोकमत’ने या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केला असता, हेल्पलाईन क्रमांकच बंद असल्याचे वास्तव समोर आले.जागतिक महिला अत्याचार विरोधी दिनानिमीत्त्य जिल्ह्यातील आकडेवारी व माहिती जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने १०३ या क्रमांकाच्या हेल्पलाईनवर दुपारी १ वाजताच्या सुमारास संपर्क साधला. मात्र सदर क्रमांकच नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पुन्हा त्याच क्रमांकावर चार ते पाच वेळा संपर्क साधण्यात आला. मात्र संपर्क झाला नाही. यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी प्रतिनिधीने पोलीस मुख्यालयाच्या महिला मदत केंद्राला भेट दिली. तेव्हा महिला पोलीस उपनिरीक्षक वाघपंजे यांची भेट घेऊन विचारना केली. तेव्हा त्यांनी १०३ क्रमांकाचा जिल्हा मुख्यालयी हेल्पलाईन क्रमांकच नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना अत्याचारपीडित महिलांना तक्रार नोंदवायची असल्यास कुठे नोंदवायची, असा प्रश्न केला असता, १०९१ क्रमांक असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, प्रत्येक पोलीस ठाण्यात अत्याचार पीडित महिलांना, मुलींना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी महिला तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून महिलांवरील तक्रारीचे निवारण केले जाते. पीडित महिलांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली जाते. मात्र शासनाने सुरू केला हेल्पलाईन क्रमांकच बंद असल्याने यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.१०३ या हेल्पालाईन टोल फ्री क्रमांकाऐवजी जिल्हा पोलीस प्रशासनाचे महिलांच्या मदतीसाठी १०९१ हा टोल फ्री हेल्पालाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. मात्र अनेकांना या नंबरविषयी कल्पनाच नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या क्रमांकाची शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्यात आल्याचे सांगितले. यासाठी पोलीस मित्राची मदत घेतली जात आहे. तर वर्षभरात महिला अत्याचाराच्या किती घटना घडल्या याविषयी पोलीस प्रशासनाला माहिती मागितली असता, ती मिळू शकली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)शासनाच्या हेल्पलाईन क्रमांकामुळे स्त्रियांना आपतकाळात मदत देण्याचा शासनाचा चांगला हेतू होता. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात हा क्रमांक बंद असल्याचा अनेकांना अनेकदा अनुभव आला. त्यामागील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. - भाग्यश्री डोर्लीकर, गृहिणी सिंदेवाही. राज्य शासनाने अत्याचार पीडित महिलांसाठी १०३ ही टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केली. मात्र चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाची यापूर्वीच १०९१ क्रमांकाची टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली होती. सदर हेल्पलाईनचा नंबर बदलविण्यात आला नसला तरी १०९१ क्रमांकावर अत्याचार पीडितांच्या तक्रारी येतात व त्यावर पोलीस प्रशासनाकडून तत्काळ कारवाई केली जाते. राज्य शासनाचा १०३ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यासाठी बीएसएनएल कंपनीकडे अर्ज करून काही दिवस दोन्ही नंबर व त्यानंतर १०३ हा एकच क्रमांक सुरू ठेवला जाईल. - संदीप दिवाण, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.राज्य शासनाने अत्याचार पीडित महिलांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनबद्दल माहिती आहे. ही योजना राबविण्यामागे शासनाचा हेतू चांगला आहे. मात्र हा क्रमांक बदलला याची जनजागृती करून जनसाामन्यांपर्यंत माहिती पोहोचविणे गरजेचे होते. - पूजा खंगार, विद्यार्थिनी चंद्रपूर.
महिला अत्याचारविरोधी हेल्पलाईन क्रमांक बंद
By admin | Published: November 25, 2015 3:28 AM