भोजराज गोवर्धन
मूल : बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गेेल्या अनेक वर्षांपासून केल्या जात आहे, मात्र मूल तालुक्यात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात पंचायत समितीच्या महिला सदस्यांनाच डावलण्यात आल्याने महिला सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून कार्यक्रमाच्या आयोजकात आणि मूल पंचायत समितीच्या सदस्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
सदर कार्यक्रमाच्या आयोजकावर कारवाई करण्याची मागणी मूल पंचायत समितीच्या सदस्य वर्षा लोनबले यांनी केली आहे.
मूल पंचायत समितीच्या सभागृहात १० मार्च रोजी जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत घेण्यात आला, या कार्यक्रमाला मूल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रम महिला दिनाचा होता आणि सहा सदस्य असलेल्या मूल पंचायत समितीमध्ये केवळ चंदू मारगोनवार हे एकमेव पुरुष आहेत, उर्वरित तिन्ही महिला सदस्य आहेत. मात्र महिला दिनाच्या कार्यक्रमात आयोजकांनी एकाही महिला सदस्यांना बोलविले नाही. यामुळे सदर कार्यक्रम नेमका कोणासाठी घेण्यात आला किंवा केवळ उमेदच्या महिलांचा सत्कार करण्यासाठी घेण्यात आला, असा प्रश्न पंचायत समितीच्या महिला सदस्यांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यातील उमेद अभियानाचे मुख्य कार्यालय मूल पंचायत समिती परिसरात आहे. मूल तालुक्यात उमेद अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मानधन तत्त्वावर कर्मचारी कार्यरत आहेत, बचत गटातील महिलामधून तालुक्यात अनेक ग्रामसंघ, प्रभाग संघही कार्यरत आहे, सदर अभियानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचे मोठे आवाहन असतानाही मूल पंचायत समितीच्या सदस्यांनाच डावलण्यात येत असेल तर सर्वसामान्य महिलाना उमेद कर्मचारी काय न्याय देऊ शकतात असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
कोट
कार्यक्रमाचे निमंत्रण मूल पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना देण्यात आले होते. वर्षा लोनबले यांना प्रभाग समन्वयक अमर रंगारी यांच्या मार्फत निमंत्रण पाठविण्यात आले होते. त्यामुळे महिला सदस्यांना डावलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- माया सुमटकर, तालुका व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मूल.