वनसडी : कोरपना तालुक्यातील अंतरगाव (बु.) येथे मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. ६0 हजार लिटर क्षमतेच्या टाकीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होतो. परंतु काही महिन्यांपासून जागोजागी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फूटली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी गळती सुरु आहे. त्यामुळे गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने पाण्याची समस्या गंभीर आहे. येथील पाणी पुरवठा पैनगंगा नदीवरुन होतो. या टाकीत पाणी मुबलक प्रमाणात असतानासुद्धा संबधितांच्या दुर्लक्षामुळे गावातील नागरिक पाण्यापासून वंचित आहे. मागील आठ दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे विहिरीत मोठय़ा प्रमाणात पाणी जमा आहे. तरीही महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळ योजनेची त्वरित दुरुस्ती करुन ग्रामस्थांनी पाण्याची अडचण दूर करावी, अशी मागणी नितीन मडावी, अरुण मोरे, घनश्याम बोबडे, पंकज वडस्कर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील इतर योजनांचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)
अंतरगाव येथे पाण्यासाठी महिलांची भटकंती
By admin | Published: May 12, 2014 11:30 PM