गोंडपिपरी : मागील महिन्यापूर्वी तालुक्यातील राळापेठ येथे अज्ञात आजार व डेंग्यूने कहर केला. यात पाच जणांना प्राणास मुकावे लागले. दूषित पाणीपुरवठा, सांडपाणी व घनकचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या हेच आजाराचे कारण असल्याची बतावणी करत आरोग्य विभागाच्या शिबिरातून बऱ्याच दिवसानंतर रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. असे असतानाही काही अंधविश्वासुंनी गावातीलच एका इसमावर जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त करून गावकऱ्यांच्या साथीने त्याला मारहाण केली. बाहेरगावहून मांत्रिक बोलावून पूजापाठ करून गाव बांधल्याची कुजबुज आता सुरू झाली आहे.गेल्या महिन्यात तालुक्यातील राळापेठ येथे डेग्यूसदृश ताप व अज्ञात आजाराने थैमान घातले होते. रोगाची तीव्रता बघता अवघ्या एका महिन्यात याच गावातील पाच व्यक्तींना प्राणही गमवावे लागले. राळापेठ गावावर कोसळलेले आजाराचे संकट हे तेथील दुषित पाणी पुरवठा, घनकचरा व सांडपाण्याने तुडुंब भरलेल्या नाल्या, गटारे हेच कारणीभूत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सलग पाच मृत्यू झालेल्या राळापेठ गावात बाहेरगावहून पाणी पुरवठा व तेथील नाल्यांची साफसफाई करताच मृत्यू सत्र थांबले व राळापेठवासीयांसह आरोग्य विभाग व क्षेत्र लोकप्रतिनिधींनी सुटकेचा निश्वास घेतला. मात्र सदर घटनेला आठवडा ते दोन आठवडे लोटताच राळापेठ येथील काही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्यांनी गावात कहर माजविणाऱ्या मृत्यूसत्रामागे जादूटोण्याचा संशय व्यक्त केला. त्याच गावातील एका कुटुंबातील व्यक्तीला विहीरीचे पाणी न भरू दिल्यामुळे विहीरीवरच जादू केल्याचे आरोप ठेवत त्याला मारहाण केल्याची कुजबुज काही गावकऱ्यांकडून सुरू होऊन शहरवासीयांपर्यंत पोहोचली.अंधश्रद्धेवरील विश्वास एवढ्यावरच न थांबविता तेथील एक शिक्षकी पेशातील गावकऱ्याने जादूटोणा थांबविण्यासाठी बाहेरगावहून एका मांत्रीकास पाचारण करून पूजापाठ केली. त्या माध्यमातून गावाची बांधणी केल्याची चर्चाही आहे. राळापेठ गावात आजाराचे थैमान असताना गावकऱ्यांची भेट घेण्यास गेलेले जिल्हा परिषद सदस्य संदीप करपे यांच्या पायाला दुसऱ्या दिवशी सुजण आली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते राळापेठ वासीयांच्या भेटीला जावू शकले नव्हते. त्यांच्या पायाला सूज येण्याचे कारणही जादूटोणा असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले होते, अशी माहिती करपे यांनी दिली. आपला अंधश्रद्धेवर विश्वास नसल्याचे सांगत ग्रामस्थांची भिती दूर करून आरोग्य सेवेतून आजारावर नियंत्रण मिळविण्याचा सल्लाही दिल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संगणक युगात प्रगतीला आड ठरणारी अंधश्रद्धेची ही घटना वाऱ्यासारखी पसरली असून याबाबत राळापेठ वासीयांचे मौन तर नागरिकांची या विषयावर चर्चा रंगत आहे. (तालुका प्रतिनिधी)
राळापेठेतील मृत्युसत्रामागे जादूटोण्याचा संशय
By admin | Published: June 25, 2014 12:22 AM