सावली : तालुक्यातील हरित क्रांतीकडे वाटचाल करणाऱ्या आसोलामेंढा प्रकल्पाच्या नहरावरील मुख्य दरवाजांचे काम मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने भविष्यात सिंचन समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ब्रिटिशकालीन आसोलामेंढा तलावाला गोसी खुर्द प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे तलावाची सिंचन क्षमता सुमारे ५० हजार हेक्टरपर्यंत वाढणार असल्याचे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने आसोलामेंढा प्रकल्पांतर्गत अनेक छोट्या मोठ्या कामांचे नूतनीकरण युद्ध पातळीवर सुरू आहे. सर्वच कामे सुरळीत सुरू असताना या तलावाच्या कालव्यावरील मुख्य दरवाज्यांचे काम मागील दोन महिन्यांपासून रखडले आहे. भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन मुख्य दरवाज्याच्या बांधकामात दुरूस्ती सुचविण्यात आली आहे. त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून नागपूर येथील अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांच्याकडे १० फेब्रुवारी २०२१ ला पाठविण्यात आला. मात्र तो प्रस्ताव अजूनही तेथेच धूळखात पडला असल्याचे बोलले जात आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्चून मुख्य दरवाजांचे बांधकाम होत आहे.
कार्यकारी अभियंता आसोलामेंढा प्रकल्प नूतनीकरण विभाग सावली (स्थित मूल) क्र. १ या कार्यालयाकडे मुख्य दरवाजांसह कालव्यांचे सुद्धा काम आहे. परंतु सदर कार्यकारी अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे प्रकल्पाची कामे रखडण्यात कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. हे बांधकाम योग्य पद्धतीने होण्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान विद्यमान अंदाजपत्रकात दुरूस्ती सुचवून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच मंजुरीसाठी दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. पावसाळ्यापूर्वी दरवाजांचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.