चंद्रपूर : मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीत ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली. अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या नावावर गौडबंगाल सुरू केले. त्यामुळे यंदाही या रस्त्यांची दैना कायम राहणार आहे. ११ कोटी ८५ लाखांचा निधी मिळाला असतानाही अधिकाऱ्यांच्या ढिम्म नियोजनामुळे या कामांना प्रारंभ झाला नाही. परिणामी आता गावखेड्यातील नागरिकांना गुळगुळीत रस्त्यांवर प्रवास करण्यासाठी किमान सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.मागील वर्षी जुलै आणि आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत गावखेड्यातील रस्त्यांची पूर्णत: वाट लागली. छोटे-मोठे पूल वाहून गेले. अनेक गावांचा शहरापासून संपर्क तुटला. आजही अनेक गावांना जाण्यासाठी नागरिकांना वाट तुडवीतच जावे लागत आहे. साधे सायकलने जायचे झाल्यास त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मध्यंतरीच्या काळात रस्त्यांसाठी निधीची कमतरता होती. त्यामुळे बांधकाम विभागाचे अधिकारी निधीचे कारण पुढे करीत होते.या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी वारंवार केल्यानंतर बांधकाम विभागाला निधी प्राप्त झाला. पण अधिकाऱ्यांच्या ढिम्म नियोजनामुळे अद्यापही या कामांना प्रारंभ झाला नाही. केवळ अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करुन रस्त्यांची कामे ठप्प पाडल्याचा आरोप आता होत आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तर आता पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे आणि पुन्हा आचारसंहिता लागल्याचे कारण अधिकाऱ्यांनी समोर केले आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांना विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता पावसाचे आगमन होत आहे. त्यामुळे पावसात रस्ते दुरुस्त करणे शक्य नाही.त्यामुळे रस्ते गुळगुळीत करण्यासाठी आता सहा- सात महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत गावखेड्यातील नागरिकांना रस्त्यांची प्रतीक्षा व मनस्ताप सहन करावा लागेल. यास बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आहे. (शहर प्रतिनिधी)
निधी मिळूनही कामांना प्रारंभच नाही
By admin | Published: June 23, 2014 12:01 AM