सीईओंनी दिला कर्मचाऱ्यांना अल्टिमेटमचंद्रपूर : जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सीईओंनी कंबर कसली आहे. गावागावांत जाऊन भेटी देणे सुरु केले आहे. या भेटीमध्ये त्यांना अनेक गावांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शौचालयांचे बांधकाम रखडल्याचे लक्षात आल्याने आता अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. ग्रामसेवकांपासून तर बिडीओंपर्यंत सर्व जण आता सीईओंच्या रडारवर आहे.मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले तथा मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी गाव भेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या भेटीमुळे गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मात्र कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटत आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी शासकीय कामात हयगय केली आहे. लाभार्थ्यांना योजनांचा फायदा न देता कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवून अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. आता मात्र खुद्द सीईओ गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत असल्याने कर्मचाऱ्यांचा खोडारडेपणा त्यांच्या लक्षात येत आहे. एवढेच नाही तर, ग्रामस्थ थेट अध्यक्ष, सीईओंकडे तक्रार दाखल करीत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सीईओंनी आता अधिकारी, कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम दिला आहे. काम दाखवा अन्यथा कारवाई करू, असे बजावल्याने काही कर्मचाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे.दोन दिवसापूर्वी मूल तालुक्यातील गांगलवाडी, चिखली, चितेगाव, मारोडा, उश्राळा या गावांनी भेट देण्यात आली. यावेळी सलिल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, एवढेच नाही तर, त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे वाचन घेतले. अंगणवाडी सेविकेसोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी कार्यकारी अधिकारी( पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहीते, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, मापारी,उपसभापती वलकेवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
काम करा अन्यथा घरी बसा!
By admin | Published: January 04, 2015 11:07 PM